नाशिक (प्रतिनिधी): ब्रिटन मधील नवीन कोरोना व्हायरसमुळे सगळे जग चिंतेत आहे. आणि याच ठिकाणाहून तब्बल १२१ नागरिक नाशिकमध्ये आले आहेत. त्यातील जवळजवळ ९६ नागरिक हे नाशिक शहरातील आहेत. शासनाच्या आदेशानुसार यांना शोधून यांच्या कोरोना चाचण्या करण्यास प्रारंभ झाला आहे. परंतु यातील पंधरा ते वीस प्रवाशांशी संपर्क होत नसल्याने प्रशासन धास्तावले आहे.
ब्रिटन मधील या भयंकर कोरोना व्हायरस मुळे तेथील विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत.परंतु, त्यानंतर देखील ब्रिटन मधून राज्याच्या विविध ठिकाणी गेलेल्या प्रवाशांची पुन्हा चाचणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
२५ नोव्हेंबरला प्रवाशांची यादी महापालिकेला पाठवली आहे. परंतु, बापूसाहेब नागरगोचे (वैद्यकीय अधीक्षक मनपा) यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने पाठवलेल्या यादीतील सुमारे २० जणांचे पत्ते मिळत नाहीये किंवा +४४ या क्रमांकाने सुरू होणारे फोन लागत नाही यामुळे या लोकांचा शोध सुरू आहे. या सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच ते शहरात दाखल झाले होते यामुळे अडचणीचे काही कारण नाही असे त्यांचे म्हणणे आहे.