बहिणीशी चॅटिंगची कुरापत काढत मारहाण, दहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
नाशिक (प्रतिनिधी): मित्राला सिमकार्ड देत आधी बहिणीच्या नावाने खोटे चॅटिंग करत, नंतर माझ्या बहिणीशी चॅटिंग का करतो अशी कुरापत काढत एका दहावीतील विद्यार्थ्याला व त्याच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली.
मुलाला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. त्यामुळे दहावीतील या मुलाने घाबरून गुरुवारी (दि. २८) पहाटे गळफास घेत आत्महत्या केली.
तळेगावरोही (ता. चांदवड) येथे ही घटना घडली असून शुभम राजाराम वाकचौरे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
त्याच्या वडिलांनी चांदवड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभमचे वडील राजाराम विश्वनाथ वाकचौरे यांनी चांदवड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोन ते तीन दिवसांपासून गावातील एकाने दुसऱ्या एकाला सिमकार्ड देऊन स्वत:च्या बहिणीच्या नावाने व्हाॅट्सअॅप व इन्स्टाग्रामवर शुभमशी खोटे चॅटिंग केले. त्यानंतर मंगळवारी (दि. २६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हे संशयित घरी आले व त्यांनी शुभमला तू माझ्या बहिणीशी चॅटिंग करतो अशी कुरापत काढून मारहाण करत दमदाटी केली.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10573,10570,10568″]
त्यानंतर मुलीच्या वडिलांनीही कुटुंबियांना दमदाटी केली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पुन्हा दहा मुलांनी घरासमोर येऊन मुलगा शुभम व कुटुंबियांना मारहाण केली. त्यानंतर २७ एप्रिलला शुभमला व्हाॅट्सअॅप करून जिवे मारण्याची धमकी दिली. दोष नसताना त्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याने शुभमने घाबरून गुरुवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास घरात आत्महत्या केली.
पोलिसांनी विजय बाळासाहेब भोकनळ, योगेश रमेश वाकचौरे, गणेश बाळू सोनवणे, अक्षय जेऊघाले (रा. निमगाव वाकडा, लासलगाव), गोकुळ बबन भोकनळ, युवराज बबन भोकनळ, विठ्ठल वसंत भोकनळ, अमोल अशोक भोकनळ, आकाश अशोक भोकनळ, बाळासाहेब रामदास भोकनळ (सर्व रा. तळेगावरोही, ता. चांदवड) या दहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक समीर बारवकर तपास करीत आहेत.