नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील इंदिरानगर परिसरालगत असलेल्या वडाळा गावातील अण्णाभाऊ साठेनगर मधल्या युसुफ तरार यांच्या मालकीच्या प्लॅस्टिकच्या गोदामाला आग लागली. या घटनेने संबंधित परिसरात भीती निर्माण झाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना यश आले.
सोमवारी (दि.३० नोव्हेंबर) रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हि आग लागली असून, आग मेहबूबनगरपर्यंत पोहचण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, शहरातील शिंगाडा तलाव, नाशिकरोड, सिडको, पंचवटी इत्यादी भागातील अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. परिसरात आग लागल्याचे कळताच बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. तर अरुंद गल्ल्या व परिसरातील वीज बंद केल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. परंतु अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले असून, कुठल्याच प्रकारची जीवितहानी झाली नाही. हि आग फटाक्यांमुळे लागली असल्याची शक्यता दर्शवली जात आहे.