प्राध्यापकांनंतर आता मद्यधुंद रिक्षाचालक, नाशिकमधील प्रवाशासोबत नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी मद्यपी चालकाचा धुमाकूळ नाशिक शहराने पाहिला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या कारचालकाने अनेकांना उडवून जखमी केले.
आता दुसऱ्या एका मद्यपी चालकाने धुमाकूळ घातला. नाशिकरोडहुन भरधाव वेगात निघालेल्या या रिक्षाचालकाणे स्पीड ब्रेकर न बघताच रिक्षा चालवली…
शिवाय रस्त्यात रिक्षा पलटी झाल्याने रिक्षातील वृद्ध जखमी झाला. मात्र घटनेनंतर रिक्षाचालक फरार झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
नाशिक शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या नाशिकरोड परिसरातील ही घटना आहे. या ठिकाणाहून शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गंगापूर रोडला जाण्यासाठी एका 65 वर्षीय वृद्धाने स्पेशल ऑटोरिक्षेची बुकिंग केली होती.
मात्र रिक्षाचालक नाशिकरोड हुन निघाल्यानंतर भरधाव वेगाने रिक्षा चालविल्याने एका स्पीड ब्रेकरवर रिक्षा उलटली. यात वृद्ध गंभीर जखमी झाला. तर रिक्षा चालक रिक्षा घेऊन पळाला.
सविस्तर वृत्त असे की, नाशिक रॉड रेल्वे स्टेशनवर एक वृद्ध उतरल्यानंतर त्याने नाशिकरोडहून स्पेशल ऑटोरिक्षेची बुकिंग केली होती. नाशिकरोडहुन ते बसल्यानंतर हिंदी भाषिक असलेल्या रिक्षा चालक रिक्षा भरधाव वेगात पळवण्यास सुरवात केली. अशातच तो रिक्षा वेडी वाकडी देखील चालवत होता. रस्त्यात अनेकांना त्याने कटही मारला होता. यावर वृद्धाने रिक्षा हळू चालव असे वारंवार सांगून देखील रिक्षाचालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्पीड ब्रेकरवर उधळून ही रिक्षा पलटी झाली. रिक्षेत अडकलेल्या वयोवृध्द प्रवाशाला नागरिकांनी बाहेर काढताच रिक्षाचालक मात्र रिक्षा घेऊन फरार झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे रिक्षा चालक मद्यधुंद अवस्थेत होता, तसेच तो वारंवार सिगारेटही पीत होता असे प्रवाशाचे म्हणणे आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल झाला आहे..
![]()


