नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने प्रतिबंधित क्षेत्रात सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत आढावा घेण्यासाठी पंचवटीतील प्रतिबंधित क्षेत्रात व मेरी येथील कोरोना कक्षाची आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपाच्या पदाधिकारी,पोलीस प्रशासन व वैद्यकीय पथका समवेत केली.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना महापालिकेच्या वतीने केल्या जात आहेत. पंचवटीतील फुलेनगर, रामनगर,पेठरोड परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या ठिकाणी विविध उपाययोजना मनपाच्या वतीने करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह स्थानिक नगरसेवक यांनी पाहणी केली. पंचवटीतील पेठरोड परिसरातील रामनगर ते फुलेनगर बस स्टॉप पर्यंत पाहणी करण्यात आली. यावेळी हा परिसर ठिकाणी बॅरिकॅडींग लावून प्रतिबंधित करावा जेणेकरून परिसरातील नागरिक येथून बाहेर जाऊ शकणार नाही अथवा या ठिकाणी कुणीही आत येऊ शकणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्या तसेच घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी सुरू असून याबाबतच्या नोंदी घेण्याच्या सूचना वैद्यकीय पथकास दिल्या. परिसरात औषध फवारणी करण्यात येत असून त्याबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.
तसेच तपासणी करताना हाय रिस्क, लो रिस्क तसेच ओपीडी मध्ये येणारे रुग्ण याच्या सर्व तपासण्या करून योग्य ते उपचार करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. परिसरातील राहिवाश्यांना होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करणे, सार्वजनिक शौचालयांमध्ये औषधे फवारणी करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आरोग्य विभागास देण्यात आल्या.ठिक-ठिकाणी नागरिकांची जनजागृती करण्याच्या दृष्टीने मनपा पदाधिकाऱ्यांनी मनपास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या पदाधिकाऱ्यांना केले.
मनपाच्या मेरी येथे नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची पाहणी यावेळी करण्यात आली. या कोविड केअर सेंटर सह इतर कोविड केअर सेंटर परिसरात मनपा कडून केले जाणारे उपचार,दिल्या जाणाऱ्या सुविधा व सर्व समावेशक शासन नियमावलीचे फलक लावण्याच्या सूचना दिल्या.तसेच मेरी येथील कोरोना कक्ष येथे सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था त्वरित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.दाखल असलेल्या रुग्णांना योग्य ते उपचार, पुरेसे कॅलरीज युक्त अन्न दिले जात आहे जेणे करून रुग्ण लवकर बरा होईल या बाबत काळजी घेतली जात आहे.
शहरात जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी केली जात असून आवश्यकतेनुसार स्वाब ही घेतले जात आहेत.त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असून घाबरून जाण्याचे कारण नाही मात्र सर्वांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.शहरात रुग्णांची संख्या वाढली तरी त्यांच्यासाठी रुग्णालयात बेडची संख्या पुरेशी असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.