नाशिक (प्रतिनिधी) : पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील २ महत्वाची शहरे असून, यांना जोडणाऱ्या सहापदरी महामार्गाच्या विकासासाठी ६५० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-नाशिक महामार्गाच्या विकासाठी ६५० कोटी निधी मंजूर झाल्याची घोषणा केली असल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. त्यानुसार,
पुणे-नाशिक महामार्ग क्र. ६० च्या नाशिक फाटा ते चांडोली या सेक्शनमधील मोशी (इंद्रायणीनगर) ते चांडोली या १८ किमी लांबीच्या सहापदरी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती अमोल कोल्हे यांनी सांगितली आहे. तसेच या मार्गावर चाकण जंक्शन येथे उड्डाणपूलदेखील प्रस्तावित आहे. पुणे-नाशिक महामार्गामुळे प्रवास आणखी सोपा होणार, तसेच परिसरातील धर्मिक पर्यटनाला देखील चालना मिळेल. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील नियंत्रणात येईल तर, यामध्ये ७ अंडर पास, २ ओव्हर पास आणि २ एलिव्हेटेड पूलचा समावेश आहे.