जयेश साबळे, महाराष्ट्र एक्स्प्रेस ग्रुप, नाशिक
गढूळ पाण्याच्या मुद्द्यावरून महासभेत मोठा गोंधळ झाल्याचे चित्र आजच्या महासभेत बघायला मिळाले. नाशिक महापालिकेच्या महासभेदरम्यान शिवसेनेकडून महापौरांचा राजदंड पळावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. त्यामुळे चांगलाच गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं, तर महापौरांकडून काही वेळा साठी महासभा तहकूब करण्यात आली…
पाणी प्रश्नांवरून महासभेत शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले, नाशिकरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ आणि अळ्या असलेला पाणी पुरवठा होत असून मनपा प्रशासनाचे अधिकारी लक्ष देत नाही; त्यामुळे या मुद्द्यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले
महापौरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ सुरू केला आणि महापौर ज्या स्थायी समितीच्या सभागृहातून सभा संचलित करत होते त्या ठिकाणी सत्यभामा गाडेकर, रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, सूर्यकांत लवटे, ज्योती खर्जुल यांच्यासह अन्य नगरसेवकांनी धाव घेतली आणि महापौरांना जाब विचारणे सुरु केले.
महापौरांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करत असल्याचं सांगितलं त्यानंतरीही ‘उत्तर द्या, उत्तर द्या, महापौर उत्तर द्या’ अशा घोषणा दिल्या. या गोंधळात महापौर गर्दीतून वाट काढून कसेबसे बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या टेबलावर ठेवलेल्या राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपाच्या नगरसेवकांनी तो घेऊ दिला नाही. मुळात ही सभा तहकूब झाली असताना देखील दोन्ही पक्षातून अकारण सुरू असलेली राजदंडाची रस्सीखेच बघून अधिकारीदेखील बाहेर पडले तर भाजपाचे सभागृहनेते सतीश सोनवणे आणि गटनेते जगदीश पाटील यांनी विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर काही वेळाने हा गोंधळ थांबल्याचे दिसून आले.