नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिकला आठवड्यातून 1 दिवस राहणार पाणीपुरवठा बंद; पाणीकपात नियोजनासाठी आज बैठक
नाशिक (प्रतिनिधी): प्रशांत महासागरामध्ये ‘अल निनो’ वादळामुळे यंदा मॉन्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्टपर्यंत पाणी जपून वापरण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाच्या सूचनेनुसार कृती आराखडा तयार केला आहे.
त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने गुरुवार किंवा शनिवारी आठवड्यातून एक संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार बुधवारी (ता. ५) अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेणार आहे.
धरणांमध्ये उपलब्ध पाणी साठ्याचा विचार करून ३१ जुलैपर्यंत नियोजन केले जाते. यंदा मात्र ३१ ऑगस्टपर्यंत नियोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. याला कारण म्हणजे दक्षिण प्रशांत महासागरामध्ये जून महिन्यात ‘अल निनो’ वादळ येणार असून त्यामुळे मॉन्सून लांबणीवर पडणार आहे.
राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या संदर्भात राज्यातील सर्व महापालिकांना सूचना देऊन जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पाणी जपून वापरण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेने एप्रिल महिन्यापासूनच पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र पाणी कपातीचा दिवस मात्र निश्चित झालेला नाही.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात करताना गुरुवार किंवा शनिवार, असा दिवस निश्चित केला जाणार आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांची पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी बैठक होऊन त्यावर शिक्कामोर्तब होईल. दर शनिवारी वीज वितरण कंपनीकडून पुरवठा खंडित केला जातो.
यादरम्यान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडूनदेखील जलवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले जाते. हाच दिवस निश्चित करून पाणीकपात करण्याचे नियोजन आहे. जून महिन्यात आठवड्यातून दोनदा पाणीकपात होणार असून, गुरुवार व शनिवार असे दोन दिवस निश्चित केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
असे आहे पाणी बचतीचे नियोजन:
एप्रिल महिन्यापासून आठ दिवसातून एकदा पाणीकपात केली जाईल. मे महिन्यात आढावा घेऊन आठ दिवसातून दोनदा, तर त्यानंतर टप्प्याटप्प्याने कपात वाढविली जाणार आहे. महापालिकेच्या ३१ विहीरी स्वच्छ करून आवश्यकता भासल्यास पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी पाण्याचा वापर केला जाणार आहे. टंचाई वाढल्यास १६० खासगी विहीरी अधिग्रहीत करण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या एक हजार १८९ विंधन विहिरींची दुरुस्ती केली जाईल. २० ते २५ टक्के पाणी कपातीचे नियोजन आहे…
![]()


