
३१ मार्चला रात्री १२ पर्यत ही बँक राहणार खुली!
नाशिक (प्रतिनिधी): आर्थिक वर्षाअखेरीस प्राप्त निधीचा हिशेब आणि अप्राप्त निधी मिळण्यासाठी सर्वच कार्यालयांची लगबग असते.
उशिरापर्यत हे पैसे येत असल्याने, ३१ मार्चला रात्री १२ पर्यंत ट्रेझरीसह जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी दिले आहेत.
त्यामुळे शासकीय यंत्रणांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची लगबग सुरू आहे.
शासनाकडून वित्तीय वर्षाअखेरीस उशिरापर्यंत प्राप्त झालेले अनुदान खर्चासाठी विविध शासकीय विभाग व कार्यालयांचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा कोषागार व तालुका उपकोषागार कार्यालयामधून वितरीत होणारी देयके, धनादेशाद्वारे रक्कम काढणे, महसुली उत्पन्नाच्या रकमा शासनाकडे भरणा करणे यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ट्रेझरी शाखेसह स्टेट बँकेच्या अन्य शाखा मार्च एंडिंगला रात्री १२ पर्यत खुली ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानूसार जिल्हाधिकारी कार्यालयातील स्टेट बँकेच्या कोषागार शाखेसह नाशिकरोड, देवळाली कॅम्प तसेच तालुका मुख्यालयाचे ठिकाणी असलेली स्टेट बँकेची शाखांचा यात समावेश आहे.
तसेच सुरगरणा येथील देना बँकेच्या शाखेतही याकाळात रात्री १२ पर्यंत कामकाज चालणार आहे. त्यामुळे शासकीय व निमशासकीय कार्यालयांची ३१ मार्चला बिले सादरीकरणासाठी होणारी कोंडी फुटण्यास मदत मिळणार आहे.