नाशिक: हृदयद्रावक; पाण्याच्या बादलीत पडून सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): घरातील प्लास्टिकच्या बादलीत पडून सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.
त्र्यंबक रोडवर सातपूर शिवारात एका लहानशा खोलीत राहणाऱ्या सिंग कुटुंबाच्या सहा महिन्यांच्या बाळाचा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
भिकाजी सिंग यांचा सहा महिन्यांचा चिमुकला श्रीरीश हा सोमवारी (दि. ११ एप्रिल) सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास झोपेतून अचानक जागा झाला.
त्याचे आई-वडील झोपलेले होते. स्वयंपाकासाठी पाणी भरून ठेवलेल्या गॅसजवळील बादलीजवळ तो रांगत गेला. खेळतांना त्याने बादलीच्या आधाराने उभे राहण्याचा प्रयत्न केला असावा. त्यावेळी दुर्दैवाने त्याचा तोल गेला. झोपेतून काही वेळानंतर जागे झालेल्या सिंग कुटुंबियांना बाळ निपचित पडल्याचे दिसताच ते घाबरले. यावेळी त्यांना दिसलेलं दृश हे हृदय पिळवटून टाकणारं होतं.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10435,10425,10417″]
या चिमुकल्याचं शीर बादलीतील पाण्यात बुडालं. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्याचा श्वास गुदमरला. सिंग दाम्पत्याला जाग आल्यावर त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत बाळाला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाची तपासणी केली असता, त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हे ऐकताच बाळाच्या मातेने रुग्णालयात हंबरडा फोडला. नानाच्या मळा परिसरातील रहिवाशांनी त्यांच्या घरी धाव घेत त्यांना आधार दिला. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.