नाशिक (प्रतिनिधी): स्वत:च्या अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने ३३ वर्षीय नराधम बापास न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड तसेच, दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. येथील जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी मंगळवारी (ता.१३) हा निर्णय दिला.
याबाबतची माहिती अशी : अल्पवयीन मुलीचे घरात तिच्या इच्छेविरोधात वारंवार अत्याचार करण्यात आला. जन्मदात्या बापाकडूनच हा अत्याचार करण्यात येत होता. ‘तू कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत मारुन टाकेन’ असा दम या नराधमाने पीडित मुलीला दिला होता.
९ ऑगस्ट २०२१ ला रात्री नऊच्या सुमारास तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली.
तपासी अंमलदार उपनिरीक्षक एम. व्ही. मोरे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सरकारी वकील ॲड. अनिल बागले यांनी नऊ साक्षीदार तपासले. सरकार पक्षातर्फे त्यांनी प्रखर युक्तिवाद केला. आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने नराधम बापास वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. या खटल्याकडे तालुक्यासह परिसराचे लक्ष लागून होते. न्यायालयाच्या निर्णयाचे येथे स्वागत करण्यात आले.
![]()


