नाशिक: स्टेट बँकेच्या ‘या’ शाखेतून कॅशिअरची नजर चुकवून तब्बल १७ लाख रुपयांची चोरी…
नाशिक (प्रतिनिधी): एसबीआय बँकेच्या कॅशिअरची नजर चुकवून लाखो रुपयांचे बदल लंपास केल्याची घटना पंचवटी भागात घडली आहे…
बँकेच्या कॅशिअरने काऊंटरजवळील टेबलावर ठेवलेले 17 लाख रुपये किमतीचे नोटांचे बंडल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना पेठ नाक्यावरील स्टेट बँकेत घडली. या धाडसी चोरीने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी युवराज दौलत चौधरी (रा. सुकृत अपार्टमेंट, गंगापूर रोड, सावरकरनगर, नाशिक) हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेठ फाट्यावरील शाखेचे प्रबंधक आहेत.
काल भरदुपारी दीड वाजेच्या सुमारास बँकेतील सर्व कामे सुरळीतपणे सुरू होती, तसेच खातेदारांचीही बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू होती, तसेच सेवानिवृत्त कर्मचारीही पेन्शनची रक्कम घेण्यासाठी आलेले होते. त्यादरम्यान बँकेचे कॅशिअर राजेंद्र बोडके यांनी त्यांच्या कॅश काऊंटरमधील जमा केलेली रक्कम मोजून टेबलावर ठेवली होती.
बँकेत असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी इसमाने या टेबलावर ठेवलेल्या रोख रकमेतील सुमारे 17 लाख रुपयांच्या नोटांचे बंडल कॅशिअर बोडके यांची नजर चुकवून लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर बँकेच्या सुरक्षारक्षकांनी सर्वत्र चौकशी केली; मात्र तोपर्यंत अज्ञात इसम ही 17 लाखांची रक्कम घेऊन पसार झाला होता. या प्रकरणी अखेर बँकेचे प्रबंधक युवराज चौधरी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत.