नाशिक: सुट्टीवर गावी आलेल्या लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: सुट्टीवर गावी आलेल्या लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): आठवडाभराची सुट्टी घेऊन गावी आलेल्या सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील 28 वर्षीय लष्करी जवानाचा शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नांदूर शिंगोटे परिसरात अपघाती मृत्यू झाला.

या घटनेमुळे खंबाळे गावावर शोककळा पसरली असून दुपारी एक वाजेच्या सुमारास लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जितेंद्र संपत आंधळे असे मृत्यू झालेल्या लष्करी जवानाचे नाव आहे. श्री. आंधळे हे 23 मराठा बटालियन मध्ये केरळ राज्यात कार्यरत होते. त्यांची कर्नाटक राज्यात बदली झाल्यामुळे दि. 21 मार्च रोजी ते पत्नी व मुलांना घेऊन गावी आले होते.

पाठोपाठ त्यांचे घरातील सामानही गावी आणण्यात येत होते. पत्नी व मुलांची गावी व्यवस्था करून ते आठवडाभराने पुन्हा नवीन नियुक्तीच्या जागी हजर होणार होते.

गुरुवारी रात्री पत्नी ज्योती, सात वर्षांचा मुलगा पियुष, तीन वर्षांची मुलगी आरोही यांना घेऊन ते जवळच असलेल्या मानोरी येथे सासरवाडीला गेले होते. त्यांना तेथे सोडून गावातीलच साडू ज्ञानेश्वर उत्तम सांगळे यांना सोबत घेऊन ते कामानिमित्त व नातेवाईकांना भेटण्यासाठी नांदूर शिंगोटे येथे गेले होते.

तेथून परत येत असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे बायपास जवळ समोरून चुकीच्या बाजूने भरधाव आलेल्या कारच्या हेडलाईट डोळ्यावर आल्याने श्री. आंधळे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडकून अपघात झाला. या अपघातात श्री. आंधळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले ज्ञानेश्वर सांगळे हे देखील जखमी झाले.

अपघाताची माहिती समजल्यावर नांदूर शिंगोटे परिसरातच असलेले वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

स्थानिक रहिवाशांच्या मदतीने दोघांनाही दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच श्री. आंधळे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले सांगळे यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी सिन्नरला नेण्यात आले.

दरम्यान , श्री. आंधळे यांच्या अपघाती मृत्यूची माहिती त्यांच्या लष्करी हेडक्वार्टरला देण्यात आली. दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास मूळ गावी खंबाळे येथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. श्री. आंधळे हे 2011 मध्ये लष्करी सेवेत दाखल झाले होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई व मोठा भाऊ, त्याचे कुटुंबीय असा परिवार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790