अनेकदा आपण पाहतो, की परिस्थिती आणि कर्जाला कंटाळून कुटुंबांमध्ये वाद होतात.. अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात.. मात्र परिस्थितीने खचून न जाता आत्मविश्वासाने मात करणे हेच खरं आयुष्य…
बर्वे कुटुंबियांचा उदरनिर्वाह कधी काळी शेतीवरच सुरु होता… जयश्री सुरेश बर्वे, वय ३३… कधी काळी शेती हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय होता… जयश्री ह्या त्यावेळी शेतीची कामेही करत होत्या. मात्र शेती व्यवसायातील अनिश्चितेमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला, आणि शेती सोडावी लागली… मात्र कर्ज असल्यामुळे यातून मार्ग काढणे गरजेचे झाले.
शेती करत असतांना ज्या हातांनी ट्रक्टर चालवला त्याच हातांनी आता रिक्षा चालवायला सुरुवात केली. जयश्री सुरेश बर्वे ह्या रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. जयश्री ह्या मुळच्या माडसांगवीच्या.. संघर्ष करून परिस्थितीवर त्यांनी मात मात केली. त्यामुळे आज त्यांच्या संसाराची गाडी सुरळीत सुरु आहे.
एक मुलगा, दोन मुली आणि पती असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या पतीनेही त्यांना साथ दिली. ट्रक्टर चालवता येत असल्याने त्यांना रिक्षा चालवतांना अडचण आली नाही. हे सगळं इतकं सोपं नक्कीच नव्हतं… एक महिला म्हणून रिक्षा चालविण्याचा निर्णय हा खरोखरच धाडसी आणि कौतुकास्पद आहे.
विशेष म्हणजे गरिबीची जाण आणि दुःखाची तीव्रता भोगल्याने जयश्री ह्या आपल्या रिक्षात अंध, अपंग आणि अपघातग्रस्त यांना मोफत प्रवास घडवून आणतात. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीबाबत त्यांचे करावे तितके कौतुक कमीच.. जयश्रीताईंच्या या जिद्दीला सलाम !