नाशिक: विद्यार्थ्यांना फ्लॅट शोधून देण्याच्या निमित्ताने प्रॉपर्टी ब्रोकर्सने घातला लाखोंचा गंडा

नाशिक: विद्यार्थ्यांना फ्लॅट शोधून देण्याच्या निमित्ताने प्रॉपर्टी ब्रोकर्सने घातला लाखोंचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी): दक्षिण अफ्रिकेतून शिक्षणानिमित्त शहरात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी फ्लॅट शोधून देणाऱ्या दोघा भामट्या ब्रोकर्सने लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

घरमालकास ठेव म्हणून दिलेल्या रक्कमेचा भामट्यांनी अपहार केल्याने हा प्रकार समोर आला आहे. तसेच, संशयितांनी थेट विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे.

फ्लॅट भाड्याने घेऊन देतो, असे सांगून त्यापोटी घेतलेली साडेतीन लाख रुपयांची रोकड घरमालकाला डिपॉझिट न देता फसवणूक करणार्‍या दोन जणांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मोसेस टोटलीसंग बाबालोला (वय 21, मूळ रा. दक्षिण आफ्रिका, ह. मु. आस्था रेसिडेन्सी, गंगापूर रोड, नाशिक) यांना व त्यांच्या मित्रांना नाशिकमध्ये फ्लॅट भाड्याने घ्यायचा होता. ते फ्लॅटचा शोध घेत असताना संशयित आरोपी गणेश पांडुरंग पाटील (वय 25, रा. खुटवडनगर, नाशिक) व निखिल प्रकाश मुदीराज (वय 37, रा. संगीत रेसिडेन्सी, गोविंदनगर, नाशिक) यांच्याशी बाबालोला यांचा संपर्क झाला.

हे ही वाचा:  नाशिक लोकसभा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

त्यादरम्यान पाटील व मुदीराज यांनी त्यांना फ्लॅट भाड्याने घेऊन देतो, असे म्हणून पाटील याने बाबालोला यांच्याकडून 17 हजार रुपये ऑनलाईन फोन पेद्वारे, तसेच मुदीराज याला 43 हजार रुपये रोख असे एकूण 60 हजार रुपये दिले. त्यानंतर फिर्यादी बाबालोला यांचे मित्र डरायस गोल यांच्याकडून 25 हजार, डेटीमले एबार यांच्याकडून 10 हजार, डेव्हिड डेमी यांच्याकडून 55 हजार, बुसी यांच्याकडून 55 हजार, बरनाडो यांच्याकडून 42 हजार, लॉरीन यांच्याकडून 30 हजार व नोबट यांच्याकडून 60 हजार असे एकूण 2 लाख 77 हजार रुपये वेगवेगळ्या दिवशी आरोपी गणेश पाटील व निखिल मुदीराज यांच्या शिंगाडा तलाव येथील श्रीजी युनिपार्क येथे असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन दिले, तर काही जणांनी आरोपींच्या खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर केले. दरम्यान, आरोपी पाटील व मुदीराज यांनी फिर्यादी बाबालोला व त्यांच्या मित्रांकडून सुमारे 3 लाख 37 हजार रुपये वेगवेगळ्या दिवशी घेऊन बाबालोेला व त्यांच्या मित्रांना गंगापूर रोडवरील सोमेश्‍वर येथील फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन दिले; परंतु फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी दिलेली डिपॉझिटची रक्‍कम आरोपी पाटील व मुदीराज यांनी घरमालकाला दिली नाही.

हे ही वाचा:  नाशिक लोकसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

डिपॉझिटबाबत घरमालकाकडून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना वारंवार विचारणा झाल्यानंतर बाबालोला व इतरांनी आरोपी गणेश पाटील व निखिल मुदीराज यांना डिपॉझिटच्या पैशासाठी फोन केले असता आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच बाबालोला व त्यांच्या मित्रांचे फोन घेणेही बंद केले, तसेच आरोपींनी शिंगाडा तलाव येथील ऑफिसही बंद केले. दि. 21 नोव्हेंबर रोजी आरोपी गणेश पाटील याने फिर्यादींना फोन करून फिर्यादी व त्याच्या दोन्ही भावांना जिवे मारण्याची धमकी दिली. फ्लॅट भाड्याने देण्याचे सांगून पाटील व मुदीराज यांनी फिर्यादी बाबालोला व त्यांच्या मित्रांकडून डिपॉझिटसाठी घेतलेल्या 3 लाख 37 हजार रुपयांचा अपहार करून ते घरमालकाला न देता फसवणूक केली.

हे ही वाचा:  नाशिक: कणगा आर्ट फाउंडेशनतर्फे तरुणाईच्या चित्रांचे प्रदर्शन

हा प्रकार दि. 5 सप्टेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींपैकी निखिल मुदीराज याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group