नाशिक (प्रतिनिधी): विदेशात शिक्षणासाठी अॅडमिशन घेऊन देतो, असे सांगून गुजरातमधील चार जणांनी एका युवतीला चार लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
मीरा नलिन पटेल (वय 26, रा. दत्त चौक, सिडको, नाशिक) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी हार्दिक गांगोडे (रा. सयाची पार्क, बडोदा), राजन मोहनलाल नंदवाणी (रा. श्रीजी निवास, सुरत), चिंतन कुमार सिंगाला (रा. अवध, सुरत) व प्रियंका शहा (पूर्ण पत्ता माहीत नाही) यांनी दि. 27 ऑगस्ट 2022 ते 10 मे 2023 या कालावधीत मीरा पटेल यांच्याशी संपर्क साधला.
फिर्यादी यांना विदेशात शिक्षणासाठी अॅडमिशन घेऊन देतो, असे सांगितले. आरोपींनी दिलेल्या माहितीवर फिर्यादी यांचा विश्वास बसला. त्यानंतर चारही आरोपींनी पटेल यांच्याकडून वेळोवेळी बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने 3 लाख 98 हजार 442 रुपयांची रक्कम स्वीकारली; मात्र विदेशात अॅडमिशन मिळवून न देता फसवणूक केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.