नाशिक: वडिलांसोबत दुचाकीवर जातांना ९ वर्षीय बालिका बिबट्याच्या हल्ल्यात जखमी
नाशिक (प्रतिनिधी): वडिलांसोबत जात असताना सोनगिरी गावातील मुलीवर बिबट्याने हल्ला केला असून नऊ वर्षीय शाळकरी मुलगी जखमी झाली आहे.
तर दुसऱ्या घटनेत मनोली येथे एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे.
सोनगिरी येथील गौरी राजेंद्र लहाने ही वडील राजेंद्र लहाने यांच्यासोबत नायगाव येथे जात असतांना सायंकाळच्या सुमारास मोटरसायकलवर येथील पाटा जवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात गौरी हिचा उजवा पायाला बिबट्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली.
मात्र राजेंद्र लहाने व गौरी यांनी आरडाओरड करताच बिबट्याने पळ काढला. त्यांनतर मनोली येथे इंदूबाई मुरलीधर गभाले या आपल्या द्राक्ष आणि टमाट्याच्या शेतात बकऱ्या चारात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात इंदूबाई यांच्या गळ्याला दुखापत झाली असून त्या या हल्ल्यात बाल बाल बचावल्या आहेत.
नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सायंकाळ नंतर शेतमाळ्यातून प्रवास करणे टाळावे असे आवाहन वनविभागाने केले आहे. तर शनिवारी भगूर मधून एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्याचप्रमाणे भगूरच्या पूर्व भागातल्या सोनगिरी भागात पुन्हा बिबट्याने दर्शन दिल्याने शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली आहे. या भागात पिंजरा बसवण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे. तर सायंकाळी व रात्री शेतमाळ्यातून शेतकरी व नागरिकांनी प्रवास करणे टाळावे असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.