नाशिक: रिअल इस्टेट व्यावसायिकास पिस्तुलचा धाक दाखवून कारसह ६६ लाख रुपये पळवले

नाशिक: रिअल इस्टेट व्यावसायिकास पिस्तुलचा धाक दाखवून कारसह ६६ लाख रुपये पळवले

नाशिक (प्रतिनिधी): रिअल इस्टेट व्यावसायिकास त्यांच्याच कारचालकाने साथीदाराच्या मदतीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सुमारे ६६ लाखांची रोकड लूट करून नेल्याची घटना मंगळवारी (ता. १५) रात्री घडली.

वयोवृद्ध व्यावसायिकाला संशयितांनी कारसह महामार्गावरील विल्होळी येथील जैन मंदिराजवळ सोडून पोबारा केला.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल झाला असून, संशयितांच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.

कन्हयालाल चेतनदास मनवानी (७२, रा. सिंधी कॉलनी, होलाराम कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची जमिनीची खरेदी- विक्री करणारी हॅप्पी होम डेव्हलपर्स फर्म आहे.

मंगळवारी (ता. १५) मनवानी नेहमीप्रमाणे सायंकाळी निवासस्थानी जाण्यासाठी निघाले. त्यांच्याकडील पिशवीमध्ये व्यवहाराची ६६ लाख ५० हजार रुपयांची रोकड होती. रोकड पिशवी घेऊन ते त्यांच्या कारमध्ये (एमएच- १५- जीएन- ९५६७) बसले आणि कारचालक संशयित देवीदास मोहन शिंदे (रा. सातपूर) यास घरी जाण्यासाठी सूचना केली.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

त्यामुळे शिंदे कार घेऊन कुलकर्णी होलाराम कॉलनीकडे निघाला. डॉ. आंबेडकर चौकात कारचालक शिंदे याने कारण नसताना कार थांबविली आणि काही क्षणात एक अज्ञात व्यक्ती कारचा मागील दरवाजा उघडून मनवानी यांच्या शेजारी बसला. त्या संशतियाने रिव्हॉल्व्हर काढून मनवानी यांना लावली व आरडाओरडा न करण्याची सूचना केली. कारचालक शिंदे याने कार पाथर्डी फाट्याच्या दिशेने नेली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

पुढे विल्होळी येथील जैन मंदिरासमोरील कच्चा रस्त्याला कार नेली आणि मनवानी यांच्याकडील रोकड हिसकावून घेत, त्यांना खाली उतरवून दिले. त्यानंतर ते कारसह पसार झाले. कन्हयालाल यांनी कच्च्या रस्त्यावरून महामार्गावर येत त्यांच्याकडील फोनवरून कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि हकिगत सांगितली. सरकारवाडा पोलिसात कारचालक देवीदास शिंदे व साथीदारांविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, सरकारवाडा ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. संशयितांचा शोध घेण्यासाठी शहर गुन्हे शाखेचे युनिट एक व दोनच्या पथकांसह सरकारवाडा गुन्हे शोध पथक सहायक निरीक्षक यतीन पाटील, गौतम सुरवाडे, उपनिरीक्षक मच्छ‌ींद्र कोल्हे, भटू पाटील, विशाल पवार,संतोष लोंढे, शैलेश गायकवाड, युवराज भोये हे शोध घेत आहेत. सदरील गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण हे करीत आहेत.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

चालकाची नियत फिरली:
मनवानी यांच्याकडे संशयित देवीदास शिंदे हा पाच महिन्यांपूर्वीच कारचालक म्हणून नोकरीवर आला आहे. मनवानी यांच्याकडे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. त्यामुळे रोजच लाखोंची रोकड जमा होऊन सायंकाळी ती रोकड घरी नेली जाते. रोजची रोकड पाहूनच चालक शिंदे यांची नियत फिरली असावी आणि त्यातूनच त्याने लुटीचा कट रचला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790