नाशिक: “या” कारणामुळे झाला चिश्ती यांचा खून; आरोपींना अटक…

नाशिक: “या” कारणामुळे झाला चिश्ती यांचा खून; आरोपींना अटक…

नाशिक (प्रतिनिधी): येवल्याजवळील चिचोंडी एमआयडीसी परिसरात झालेल्या अफगाणी धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद जरीफ चिश्ती यांच्या खूनप्रकरणी तिघांना अटक करण्यात येवला पोलिसांना यश आले आहे.

धर्मगुरू चिश्ती यांची हत्या करून त्यांच्या शिष्याच्या नावे जमा असलेली जमीन, कार व रोकड ही आपल्या नावावर करून घेण्यासाठी हा कट रचल्याचे तिघांनी कबूल केले आहे.

गेल्या दि. 5 जुलै रोजी येवल्याजवळ चिचोंडी एमआयडीसी शिवारात एका प्लॉटवर धार्मिक पूजा करून निघालेल्या सुफी ख्वाजा सय्यद चिश्ती यांची हत्या करून त्यांच्या कारसह आरोपी फरारी झाले होते.

धर्मगुरूची हत्या झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती, तर चिश्ती यांचे सेवेकरी अफजल अहमद खान यांच्यावरदेखील गोळीबार करून आरोपी त्यांची कार क्रमांक एमएच 43 बीयू 7886 मध्ये बसून फरारी झाले होते.

आरोपी अनुक्रमे गणेश ऊर्फ देवा बाबासाहेब झिंजाड ऊर्फ पाटील (वय 28, रा. शिंदे मळा, लोणी, जि. अहमदनगर), रवींद्र चांगदेव तोरे (कारचालक, वय 25, रा. शहाजापूर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) आणि पवन पोपट आहेर (वय 26, रा. विठ्ठलनगर, येवला) या आरोपींनी फरारी होण्यासाठी वापरलेली कार दुसर्‍या दिवशी संगमनेर शहरात आढळून आली होती. त्यावरून पुढील तपास केला असता आरोपी हे ठाणे, मुंबई परिसरात गेला असल्याचे समजले.

त्यावरून पोलिसांनी खबर्‍यामार्फत माहिती कळविली. तीनही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आणि येवला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपींची विशेष चौकशी केली असता त्यांनी कबूल केले, की चिचोंडी परिसरात एका प्लॉटचे भूमिपूजन करण्याच्या बहाण्याने सुफी ख्वाजा सय्यद चिश्ती यांना बोलावून घेऊन भूमिपूजन केले.

भूमिपूजन आटोपून चिश्ती हे कारमध्ये बसत असताना आरोपींनी त्यांच्या डोक्यावर गोळीबार करून त्यांना ठार केले आणि ते फरारी झाले. या आरोपींमध्ये रवींद्र तोरे या चिश्ती बाबांच्या गाडीच्या चालकाचा समावेश आहे. चिश्ती यांचे लाखो भक्त असून, मोठी संपत्ती जमा झाली होती, तसेच सेवेकरी गफार अहमद खान याच्या नावावर घेतलेली जमीन, कार व रोख रक्कम ही आपल्या नावावर करून घेण्याचा या तिघांचा कट होता, अशी कबुली दिली.

नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, येवला शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे, उपनिरीक्षक नाना शेवाळे, हवालदार रवींद्र वानखेडे व जालिंदर खराटे, पोलीस नाईक सुशांत मरकड, सचिन पिंगळ, विनोद टिळे, तसेच हवालदार उदय पाठक, प्रशांत पाटील, पोलीस नाईक विश्‍वनाथ काकड, नवनाथ वाघमोडे, येवल्याचे पोलीस नाईक शहानवाज शेख व गणेश पवार यांच्या पथकाने या हत्येचा यशस्वी उलगडा करून तिघा आरोपींना अटक केली आहे. यप्रकरर्णी सेवेकरी गफार अहमद खान यास घटनेच्या दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यामुळे एकूण आरोपींची संख्या 4 झाली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790