नाशिक: मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा अड्डा चालविणारे केदारे व माने यांना अटक !
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
याच मोहिमेअंतर्गत पी.सी.बी.एम.ओ.बी. मध्यवर्ती गुन्हे शाखेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा अड्डा चालविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
शहरात छुप्या मार्गाने मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखे अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षास आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले होते.
या आदेशान्वये पोलीस आयुक्तालय हद्दीत मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या पार्लर चालकांचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक संदीप पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नाशिक पुणे रोडवर जय भवानी रोडवरील प्रियदर्शनी व्हिला गेस्ट रूम येथे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु आहे.

त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी मसाज पार्लर चालक सुभाष केदारे आणि सागर माने यांना अटक करण्यात आली. तसेच वेश्या व्यवसायासाठी उत्तर प्रदेश आणि आसाम येथून आणलेल्या ३ महिला मिळून आल्या.
याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक: २३/२०२३ प्रमाणे भारतीय दंड विधान ३७०, ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.