नाशिक: मद्यधुंद कारचालकाने बेदरकारपणे कार चालवत सात ते आठ जणांना उडविले

नाशिक: मद्यधुंद कारचालकाने बेदरकारपणे कार चालवत सात ते आठ जणांना उडविले

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात आज (दि. १७ नोव्हेंबर) मद्यधुंद अवस्थेत एका कारचालकाने भरधाव वेगाने कार चालवत ७ ते ८ जणांना धडक देऊन जखमी केल्याचा भयानक प्रकार घडला आहे.

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कार चालकाने भरधाव वेगाने कार चालवून रस्त्यातील दुचाकी चालक, पादचारी यांच्यासह अनेकांना चिरडले आहे.

या गंभीर अपघातामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागांत ७ ते ८ जण जखमी असल्याचे समजते. विशेष म्हणजे जखमींमध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळच्या सुमारास एक कारचालक नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर परिसरातून येत होता. तो अतिशय बेदरकारपणे वेगाने कार चालवित होता. त्याने महामार्गावर काही वाहनांना धडक दिली.

त्यानंतर या कारचालकाने वाहन अशोकामार्ग, वडाळागाव मार्गे नाशिक-मुंबई महामार्गावर आणले. या मार्गावरही त्याने अनेकांना चिरडले आहे. त्यानंतर तो अशाच बेभान वेगात तो थेट चांडक सर्कल या ठिकाणी आला.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

यावेळी त्याच्या कारचे टायरही फुटले होते. तरीही मद्यधुंद अवस्थेत त्याने हा थरार सुरूच ठेवला. अनेकांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र या कारचालकाने त्यांनाही धडक दिली. चांडक सर्कलला अशाच बेदरकारपणे दोन ते तीन राउंड मारून तो एका ठिकाणी धडकला. प्रत्यक्षदर्शींनी त्याला कारबाहेर काढले. यावेळी तो अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

सद्यस्थितीत संशयित कारचालक पोलिसांच्या ताब्यात असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या संपूर्ण घटनेत नेमक्या अजून किती व्यक्ती जखमी झाल्या आहेत ते स्पष्ट झालेले नाही. नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दोन व्यक्ती दाखल झाल्या आहेत. यातील एका दुचाकी चालकाच्या दोन्ही पायांवरुन कार गेल्याचे समजते आहे. या मद्यधुंद कारचालकाचे नाव अद्याप समजलेले नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790