नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा Whatsapp Group जॉईन करा..
नाशिक (प्रतिनिधी): नऊ वर्षापूर्वी घडलेल्या बहुचर्चित बिपीन बाफना हत्याकांडाची सुनावणी पूर्ण झाली आहे. यात चेतन पगारे आणि अमन जट या दोघांवर असलेले दोषारोप सिद्ध झाले आहे.
तर उर्वरित अक्षय बाल्या सुळे, संजय पवार आणि पम्मी चौधरी या तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दोन दिवसांनी दोषी असलेल्या आरोपींच्या शिक्षेवर युक्तिवाद होणार आहे.
2013 मध्ये खंडणीसाठी बिपीन बाफना यांचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. खंडणीतून झालेल्या खून प्रकरणी पाच जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या खून खटल्याचा तपास आणि न्यायालयीन कामकाज पूर्ण झाल्याने आज या बहुचर्चित बाफना हत्याकांडाचा निकाल न्यायालयाने दिला आहे.
ओझर येथील धान्याचा व्यापार करणारे गुलाबसिंग बाफना यांच्या मुलाचा 2013 मध्ये आडगाव ते विंचूर गवळी रस्त्यावर असलेल्या एका शेतात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या तपासाअंती खंडणीच्या वादातून बिपीन बाफना याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते.
खंडणी मागण्याच्या वादातून संशयित आरोपींनी मुलाचे अपहरण करून त्याचा खून केला होता. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. आरोपींवर कारवाई होऊ नये यासाठी राजकीय दबावसुद्धा तपासाच्या दरम्यान टाकण्यात आले होते. मात्र पोलिसांनी खुनाच्या घटनेचा तपास योग्य दिशेने केला. त्यामुळेच बहुचर्चित बाफना हत्याकांडाच्या निकालात आरोपींना काय शिक्षा होते याकडे जिल्ह्याचा राज्याचे लक्ष लागले होते.
बिपिन वाफना हत्याकांड प्रकरणात चेतन पगारे, अमन जट, अक्षय उर्फ बाल्या सुळे, संजय पवार आणि पम्मी चौधरी हे पाच जण 2013 पासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. नऊ वर्षानंतर या खून खटल्याचा निकाल लागणार असल्याने जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
संभाव्य गोंधळ लक्षात घेता आरोपींना न्यायालय आवारात आणण्यात आले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आरोपींची ओळ्खपरेड केली असून यात मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट यांच्यावर असलेले दोषारोप सिद्ध करण्यात सरकारी वकिलांना यश आले आहे. आता या दोघांना काय शिक्षा सुनावली जाणार लक्ष लागले आहे. तर तर उर्वरित संशयित आरोपी अक्षय सुळे, संजय पवार आणि पम्मी चौधरी या तिघांना निर्दोष मुक्त केले आहे.