नाशिक: प्रशिक्षणार्थी अल्पवयीन नर्सवर डॉक्टरकडून हॉस्पिटलमध्ये अत्याचार
नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी नर्सवर डॉक्टरने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.
डॉ. उल्हास पांडुरंग कुटे (५० रा, मोरवाडी ) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित डॉ. उल्हास कुटे हे शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले असता त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी नर्सला डॉक्टरने बोलावले.
ती रूम मध्ये एकटी असल्याचे निमित्त साधून हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या रूमच्या आत प्रवेश करीत दरवाजाची कडी लावून डॉक्टर कुटे यांनी पीडित नर्सच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केले. यानंतर झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास पीडितेला काढून धमकी दिली.
प्रकरणी पीडित परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख करत आहेत..