नाशिक पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर कोयताधाऱ्यांचा धिंगाणा; दोघांविरुद्ध गुन्हा
नाशिक (प्रतिनिधी): पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मल्हार खान चौकात सराईत गुन्हेगारांसह दोघा कोयताधाऱ्यांनी सोमवारी (ता. २०) मध्यरात्री धिंगाणा घातला. दोघा संशयितांनी दोन दुचाकींसह सीसीटीव्हीची तोडफोड करीत परिसरात दहशत माजविली.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.
सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर (२५, रा. बेथेलनगर, शरणपूर रोड), यश शिंदे (रा. नागसेन, वडाळा नाका), अशी संशयितांची नावे आहेत. राजू गायकवाड (रा. कर्तव्यनगर, मल्हार खान, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. २०) मध्यरात्री संशयित पाटणकर व शिंदे हे कोयता घेऊन आले.
दोघांनी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरविली. दोघांनी परिसरातील सीसीटीव्ही व एक रिक्षा (एमएच- १५- झेड -९९९६), दुचाकी (एमएच- १५- जीडी- ४१३१) यांची तोडफोड केली. संशयित घटनेनंतर पसार झाले आहेत.
थेट पोलिसांनाच आव्हान:
मल्हार खान चौकापासून हाकेच्या अंतरावर पोलिस आयुक्तालय आहे, तर काही पावलांवर सरकारवाडा पोलिस ठाणे आहे. असे असतानाही कोयताधारी संशयितांनी दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याच्या घटनेमुळे संशयितांनी थेट पोलिसांचा आव्हान दिल्याचे दिसते आहे.
शहरातही अनेक ठिकाणी कोयताधारी टोळ्या कार्यरत झाल्या असून, रात्री गल्लीबोळ्यांमध्ये फिरून दहशत माजविली. वाढत्या घटनांमुळे शहराची कायदा व सुव्यवस्थाच धोक्यात आल्याची चिन्हे आहेत.