नाशिक: पुतण्यानेच सुपारी देऊन केली काकाची हत्या.. कर्डेल यांच्या खुनाची उकल !
नाशिक (प्रतिनिधी): अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे एका ६५ वर्षीय वृद्धाची हत्या केल्याप्रकरणी त्यांच्याच पुतण्यासह एका अल्पवयीन बालकाला अटक करण्यात आली आहे.
अंबड-सातपूर लिंक रोडवरील एक्स्लो पॉइंट परिसरातील रहिवासी व शेतकरी बच्चू कर्डेल यांच्या खुनाची अखेर दहा दिवसांनंतर उकल झाली आहे.
मृत बच्चू कर्डेल यांच्या भावाच्या मुलानेच अल्पवयीन मुलाच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले आहे.
सागर ऊर्फ पांडू वाळू कर्डेल (२८) असे पुतण्याचे नाव आहे. तर, चुंचाळे शिवारात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरील खून गेल्या २५ नोव्हेंबरला रात्री दहा वाजेच्या सुमारास करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस या खूनाचा कसून शोध घेत होते.
एक्स्लो पॉइंट परिसरात कर्डेल कुटुंबीयांची मोठ्याप्रमाणात स्थावर मालमत्ता असून, शेतीही आहे. बच्चू कर्डेल (६८) हे गेल्या २५ नोव्हेंबरला रात्री घरात एकटेच होते. तर कुटुंबीय हळदीच्या कार्यक्रमासाठी गेलेले होते. रात्री दहाच्या सुमारास ते घरात एकटे बसलेले असताना संशयित अल्पवयीन मुलाने पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात धारदार कोयत्याने दोन वार केले. वार वर्मी बसल्याने ते जागीच ठार झाले. त्यानंतर संशयिताने घरातील लहान आकारातील कोठी पळवून नेली होती. कोठीत सात-आठ लाखांची रोकड व कागदपत्रे असल्याचे सांगण्यात आले होते.
याप्रकरणी अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, पोलिसांच्या हाती काहीही धागेदोरे मिळत नव्हते. अखेरीस शोध पथकाला परिसरातील खबऱ्यांकडून संशयित सागर आणि बच्चू कर्डेल यांच्यात जमिनीवर वाद असल्याचे समजले होते. त्याच दिशेने तपास केल्यानंतर पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले. त्यानुसार, अंबड पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने रविवारी (ता. ४) पहाटेच्या सुमारास चुंचाळे शिवारातून अल्पवयीन संशयितासह सागर कर्डेल यास त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव, वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, श्रीकांत निंबाळकर यांनी कसून तपास केला. नातेवाइकांचे जबाब आणि गुप्त माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक सोनल फडाळे, संदीप पवार, अंमलदार जर्नादन ढाकणे यांना संशयितांची माहिती मिळाली. गुन्हे शाखेसहित आयुक्तालयाची चौदा पथके गुन्ह्याचा तपास करीत होते.
खूनाचा मुख्य सूत्रधार सागर कर्डेल (वय: २८) याने जमिनीच्या वादातून बच्चू कर्डेल यांच्या खूनाचा कट रचला. त्याने चोऱ्या-माऱ्या करणाऱ्या चुंचाळे शिवारातील अल्पवयीन मुलास बच्चू कर्डिले यांच्या खुनाची सुपारी दिली. २५ नोव्हेंबर रोजी घरी कोणीच नसल्याची संधी साधून दोघांनी बच्चू कर्डेल यांचा खून केला. त्यानंतर सागर पुन्हा नातलगांसह हळदीच्या कार्यक्रमात सामील झाला होता.