नाशिक: पुतण्यानेच मारला पावणे दोन लाखांवर डल्ला; 24 तासात अटक
नाशिक (प्रतिनिधी): आठवडा बाजारात बटाटा विक्रीसाठी गेलेल्या चुलत्याच्या घराच्या किचनचे गज कापून तब्बल १ लाख ८६ हजार रुपये चोरून नेणाऱ्या पुतण्याला देवळाली कॅम्प पोलिसांनी शिताफीने अटक केली.
अवघ्या २४ तासात घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
अविनाश देविदास बिरछे (रा. इंदिरा संकुल, मोठा गणपतीजवळ, भगूर, ता. नाशिक) असे घरफोडी करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. अशोक दगडू बिरछे (रा. इंदिरा संकुल, भगूर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे.
- Breaking: नाशिकरोडला शिवशाही, ओम्नी, डम्पर आणि सिटी लिंक बस यांच्यात विचित्र अपघात
- भांडण मिटवायला गेला आणि जीव गमावून बसला… टोळक्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू
त्यामुळे ते गेल्या रविवारी (ता. २४) देवळाली कॅम्पचा आठवडा बाजारात बटाटा विक्रीसाठी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास गेले. रात्री आठ वाजता ते घरी परतले असता, त्यांच्या बंद घराच्या किचनच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्याने कपाटातील १ लाख ८६ हजार ७७० रुपये चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी त्यांनी तात्काळ देवळाली कॅम्प पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये संशयास्पद हालचालीवरून एका संशयिताचा शोध घेण्यात आला. सीसीटीव्हीतील हालचालीवरून एक संशयित भगूरमधील स्वागत हॉटेल येथे रंगकाम करताना आढळून आला.
त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित अविनाश बिरछे हा फिर्यादी अशोक बिरछे यांचा पुतण्या असून, त्यानेच घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून चोरीची रोकड हस्तगत करण्यात आली असून, देवळाली कॅम्प पोलिसांनी २४ तासात घरफोडीच्या गुन्ह्याची उकल केली. सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक पाडवी हे करीत आहेत.