नाशिक (प्रतिनिधी): कोरोना चाचणी केल्यानंतर रोजच्या येणाऱ्या अहवालात रुग्णांचा पत्ता केवळ “नाशिक” असा लिहिला जात असल्याने वैद्यकीय विभागाची ट्रेसिंगसाठी धावपळ होत आहे. त्यामुळे आता अशा या नाशिक शहरातील पाच खासगी लॅबवर कोरोना चाचणीसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या आदेशाविरोधात दातार लॅब हाय कोर्टात धाव घेणार असल्याचे समजते आहे.
कोरोना चाचणी झाल्यानंतर रुग्णांचे अहवाल तयार करण्यात येतात ज्यात रुग्णांचा सविस्तर पत्ता असणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक रुग्ण स्वेच्छेने खासगी लॅबमध्ये तपासणी करत आहेत. मात्र एखाद्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा संपूर्ण पत्ता अहवालात असणे गरजेचे आहे. जेणेकरून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला अहवाल आल्यानंतर संबंधित रुग्णांपर्यंत पोहोचता येते. त्याचप्रमाणे संबंधित रुग्णाचे हाय रिस्क कॉन्टॅक्टस शोधणे सोपे जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तसे होताना दिसत नाहीये. महापालिकेच्या म्हणण्याप्रमाणे याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृष्णा, थायरोकेअर, दातार, एसआरएल तसेच इंफेक्स या लॅबवर कोरोना चाचणीसाठी पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे. या बंदीला झुगारून तपासण्या केल्यास लॅबवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या प्रकाराबाबत “नाशिक कॉलिंग”ने दातार लॅबचे प्रमुख राजन दातार यांच्याशी संपर्क केला, त्यावेळी ते बोलतांना म्हणाले, “आमच्याकडून कुठल्याच तृटी अहवालात नाही. शिवाय या त्रुटींबाबत आम्हाला लेखी स्वरुपात कळविण्यात आलेले नाही. एकदाही याबाबत सूचना मिळालेल्या नाहीत. आजपर्यंत २० हजार चाचण्या केल्या आहेत. बऱ्याच वेळा रुग्णांकडे कुठलेही कागदपत्र नसतात, त्यावेळी ओपीडीचाच पत्ता टाकावा लागतो. रुग्णांची “केवायसी” करणं हे कुठल्याही लॅबला अशक्य आहे. आधार कार्डवरही बऱ्याच वेळा लोकांचे चुकीचे पत्ते असतात. लॅबवर कोरोना चाचणीसाठी बंदी घालण बंद करणं हा अघोरी प्रकार आहे. हा निर्णय जनहितार्थ नक्कीच नाही. हा कुणाच्या स्वार्थासाठीचा घेतलेला निर्णय आहे. आम्ही या निर्णयाविरोधात हाय कोर्टात जात आहोत.”.