नाशिक: पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी एक्स्प्रेसबाबत महत्वाची अपडेट आली आहे.
मुंबई आणि ठाण्याला दररोज येण्या-जाण्यासाठी अत्यंत महत्वाची असलेल्या पंचवटी एक्सप्रेसच्या अकरा बोगी सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत.
यातील पासधारकांसह पाच बोगी ह्या नाशिकरोडला उघडणार असून, येत्या मंगळवारपासून याबाबत कार्यवाही होणार असल्याचे समजते.
कोविडचे संकट लक्षात घेता सर्वच रेल्वे गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देऊन आरक्षण तिकीट सक्तीचे करण्यात आले होते.
त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना ज्यादा पैसे आणि वेळ द्यावा लागत होता. पंचवटीच्या बोगी जनरल करण्यात याव्यात, नाशिक-कल्याण लोकल सुरु करावी, गोदावरी सुरु करावी आदी मागण्या पासधारक करत होते. ह्याच मागण्या प्रवासी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, किरण बोरसे, कैलास बर्वे, संजय शिंदे, दीपक गोरगावकर यांनीदेखील वेळोवेळी केल्या होत्या. त्याची दाखल घेऊन पंचवटी एक्सप्रेसच्या वीसपैकी अकरा बोगी आता जनरल झाल्या असून, मासिक पासधारकांची एक व जनरलच्या पाच बोगी नाशिकला उघडणार आहेत.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10187,10181,10168″]
पंचवटीप्रमाणेच नाशिकच्या प्रवाशांसाठी उपयुक्त असलेल्या तपोवन, नंदीग्राम, राज्यराणी या गाड्यांसाठी शनिवार (दि. १२) मार्चपासून रिझर्वेशन ऐवजी जनरल तिकीट देणे सुरु केले आहे. मात्र, या गाड्या मुंबईला जातांना जनरल झाल्या आहेत. मुंबईहून परतताना मात्र रिझर्वेशनचे तिकीट काढावे लागत आहे.
पासधारकांसाठी बोगी राखीव: पंचवटी एक्स्प्रेसच्या डी-७ आणि डी-८ या बोगी २२ मार्चपासून मासिक पासधारकांसाठी राखीव असतील. शिवाय, डी-९ ते डी-१८ या बोगी जनरल असतील असे रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.
इगतपुरी-भुसावळ मेमू लोकल सुरु झाली आहे. नाशिक-कल्याण लोकल सुरु करण्यासाठी चाचणी लवकरच होणार आहे. येत्या २९ जूनपासून लांब पल्ल्याच्या १६५ गाड्या पूर्वीप्रमाणेच जनरल होणार असून, त्यासाठी लसीकरण सक्तीचे असणार आहे. वैद्यकीय कारणांमुळे ज्या प्रवाशांनी लस घेतलेली नाही त्यांना डॉक्टरांचे प्रमाणपत्र लागेल.
त्याचप्रमाणे १८ वर्षांखालील युवा वर्गाला शाळा-महाविद्यालयांनी दिलेले ओळखपत्र प्रवासावेळी सोबत ठेवावे लागेल. ज्या गाड्यांचे डबे जनरल करण्यात आले आहेत, त्यातूनच जनरल तिकीटधारकांना प्रवास करता येईल. त्यांनी राखीव डब्यातून प्रवास केला तर ‘व्हीदाऊट तिकीट’ गृहीत धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.