नाशिक: पंचवटीतील ‘फायरिंग’प्रकरणी चौघांविरोधात मोक्का
नाशिक (प्रतिनिधी): पेठरोडवरील फुलेनगरमध्ये तीन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणातील चार संशयितांविरोधात पोलिस आयुक्तालयाने मोक्काअन्वये कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी वाढली असून, त्याविरोधात पोलिस आयुक्तालयातर्फे स्थानबद्धतेसह तडीपार आणि मोक्काअन्वये कारवाई करीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आयुक्त आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
विशाल चंद्रकांत भालेराव (३२, रा. मुंजाबाबा गल्ली, फुलेनगर, पंचवटी), विकास ऊर्फ विक्की विनोद वाघ (२५, रा. मरीमाता मंदिरामागे, फुलेनगर, पंचवटी), जय संतोष खरात (१९, रा. फुलेनगर, पंचवटी), संदीप रघुनाथ आहिरे (२०, रा. शेषराम महाराज चौक, फुलेनगर, पंचवटी) अशी मोक्काअन्वये कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
११ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास संशयितांनी फुलेनगरमधील तीन पुतळ्याजवळ प्रेम महाले, युवराज शेळके यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला होता. यात संशयित भालेराव व त्याच्या टोळीने कोयते व गावठी कट्ट्याचा वापर केला.
टोळीने केलेल्या गोळीबारात एका महिलेसह कुत्रा जखमी झाला होता. या घटनेमुळे फुलेनगर परिसरातील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले होते. त्यामुळे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या टोळीतील चौघांविरोधात मोक्काअन्वये कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार या टोळीविरोधात मोक्क्याची कारवाई करण्यात आल्याने फुलेनगरमधील गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता आहे.
भालेराव टोळीविरोधात ११ गुन्हे:
मोक्काअन्वये कारवाई करण्यात आलेल्या भालेराव टोळीविरोधात शहरातील पंचवटी व उपनगर पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत. यात अवैधरीत्या शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, लुटमारी, खंडणी, हप्ते गोळा करून दहशत माजविणे आदी स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.