नाशिक: नायलॉन मांजाने ६७ वर्षीय वृद्धाच्या पायाला गंभीर जखम…
नाशिक (प्रतिनिधी): गोदाघाटावर मंगळवारी (दि. २७) देवदर्शनासाठी आलेल्या वृद्धाच्या पायात नायलॉन मांजा अडकल्याने पायाला गंभीर इजा झाली आहे.
त्यामुळे उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रामसेतू पुलाजवळून पंचावातीकडे दुपारी त्र्यंबकेश्वर येथील मदनलाल भुतडा (वय: ६७) हे जात होते.
त्यांच्या दोन्ही पायात नायलॉन मांजा अडकला. पायाला जखमा होत रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले.
त्याचवेळी स्मार्ट सिटीच्या बैठकीस जात असलेले इंदिरानगर, विनयनगर येथील गर्जना युवा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी त्यांच्या पायाला रुमाल बांधून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन युवकांच्या मदतीने भुतडा यांना गणेशवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- नाशिक : वणी गडावर निघालेल्या भाविकांच्या गाडीचा मोठा अपघात, 23 जण जखमी
- Nashik Breaking : नाशिकमध्ये वॉर्डबॉयचा महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला
जखमी भुतडा यांच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना काही सुचत नसल्याने प्रवीण जाधव यांनी घडलेल्या घटनेचे छायाचित्र सोशल मिडियावर टाकले. त्यावरून त्यांच्या त्र्यंबकेश्वर येथील पुतण्याने फोनवरून संपर्क साधला आणि सायंकाळी ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. यावेळी प्रवीण जाधव यांच्या मदत कार्यामुळे काकांचे प्राण वाचल्याने त्यांचे आभार मानले.