नाशिक: दोन हजाराची नोट द्या, पण तेवढेच पेट्रोल भरा; असोसिएशनचा निर्णय…
नाशिक (प्रतिनिधी): दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे घेतला असताना, नोटा परत करण्यासाठी मुबलक कालावधी बाकी आहे. असे असताना नागरिकांकडून भितीपोटी नोटा खपविण्यावर भर दिला जातो आहे.
यामुळे पेट्रोलपंपावर इंधन भरताना अनेक ग्राहकांकडून दोन हजारांची नोट दिली जात आहे. सुटे पैशांचा प्रश्न निर्माण होत असल्याने आता दोन हजार किंवा त्यापेक्षा अधिक मूल्याचे इंधन भरणार असाल तरच दोन हजारांची नोट द्या, अशी विनंती पेट्रोलपंपचालकांकडून केली जाते आहे.
यापूर्वीदेखील नोटबंदी झालेली असताना, पेट्रोलपंपावर जुन्या पाचशे व एक हजार रुपये मूल्याच्या नोटा खपविण्याकडे नागरिकांचा कल बघायला मिळाला होता. यामुळे २०१६ मध्ये नोटबंदीच्या घोषणेनंतर पंपांवर इंधन भरताना जुन्या नोटा देणाऱ्यांची मोठी रांग लागली होती.
आत्तादेखील दोन हजार रुपये मूल्याच्या नोटेवर निर्बंध आल्यानंतर पेट्रोलपंपावर नोट खपविण्यावर भर दिला जातो आहे.
मात्र अनेक ग्राहकांकडून पन्नास किंवा शंभर रुपयांचे इंधन खरेदी करून बदल्यात दोन हजारांची नोट सादर केली जात असल्याने पेट्रोलपंपचालकाकडे सुटे पैशांचा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर तोडगा म्हणून दोन हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे इंधन खरेदीवर या नोटा स्वीकारण्याचा पवित्रा पेट्रोलपंप चालकांनी घेतला आहे.
असोसिएशनकडून सूचनाफलक:
यासंदर्भात नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनकडून फलक तयार करण्यात आले आहे. ग्राहकांना विनंती करणारे हे फलक अनेक पेट्रोलपंपांवर झळकू लागले आहेत. सर्व कंपन्यांच्या वितरकांनी एकत्रित येत यासंदर्भात निर्णय घेतला आहे.