नाशिक: दिंडोरी रोडवर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पंचवटी (प्रतिनिधी): दिंडोरी रोडवर शुक्रवारी (ता. ६) रात्री साडेसात ते आठच्या सुमारास अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरीहून निघालेला सिमेंट कंटेनर (एमपी- ०९- एचएच- ९३७८) इंदूरकडे चालला होता. दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनी येथील अंकुर साडीसमोर या सिमेंट कंटेनर डाव्या बाजूकडील मागील चाकाखाली एक दुचाकीचालक (एमएच- १५- जीजे- ३९२६) आला.
यात दुचाकीचालक किरण महादू जाधव (७२, रा. गुलमोहरनगर, म्हसरूळ, दिंडोरी रोड) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे यांच्यासमवेत सहाय्यक निरीक्षक विनायक आहिरे, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या वेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी सिमेंट कंटेनर चालक अर्जुनसिंग प्रीतमसिंग चौधरी (४६, रा. मध्य प्रदेश) यास ताब्यात घेतले असून, कंटेनर जप्त करण्यात आला आहे.