नाशिक: दांपत्याच्या आत्महत्याप्रकरणी मनियार, बैरागीविरोधात गुन्हा दाखल
नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या नवदांपत्याने कर्जबाजारीपणामुळे आणि संबंधितांकडून वसुलीसाठी होणाऱ्या तगाद्याला वैतागून गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (ता. १९) उघडकीस आला होता.
याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित युनूस मनियार, मयूर बैरागी आणि इतरांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव जितेंद्र जगताप (वय २९) आणि नेहा गौरव जगताप (२३, रा अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटी, पाथर्डी फाटा) यांनी रविवारी राहत्या फ्लॅटमध्ये संगनमताने गळफास घेत आत्महत्या केली.
पोलिसांना घरातून डायरी सापडली होती. या डायरीमध्ये नेहा आणि गौरव यांनी दहा ते बारा पानांची सुसाइड नोट सापडली होती.
या नोटामध्ये दोघांनी आत्महत्येमागील कारण कर्जबाजारीपणा आणि कर्जवसुलीसाठी युनूस मनियार याच्याकडून होत असलेला तगादा तसेच मयूर बैरागी याने या दांपत्याची साडेसहा लाख रुपयांना केलेली फसवणूक हे लिहिले होते. त्यानुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यामध्ये मनियार, बैरागी यांच्यासह इतरांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सीडीआर रिपोर्ट मागविला:
जगताप दांपत्याच्या आत्महत्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सुसाइड नोटमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे गौरव आणि नेहा यांच्या फोन रेकॉर्डनुसार सीडीआर रिपोर्ट्स मागविले आहेत. संशयित मनियार आणि बैरागी यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. त्याचप्रमाणे बँक व्यवहार, धनादेशाद्वारे करण्यात आलेला व्यवहार, कर्जाच्या व्यवहाराच्या कागदपत्र याचीही माहिती पोलिस घेत आहेत.
हस्ताक्षराची होणार तपासणी:
गौरव आणि नेहा यांनी लिहिलेल्या दहा ते बारा पानांच्या सुसाइड नोटमधील अक्षरांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी ही डायरी ‘सीआयडी’कडे सोपविण्यात आली आहे.
कर्ज सावकारी की बँकेचे?:
गौरव आणि नेहा यांनी ज्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे, ते कर्ज अवैधरीरित्या सावकारी पद्धतीने घेतले होते की बँकेचे होते, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. संशयितांच्या अटकेनंतर ही बाब स्पष्ट होण्याची शक्यता आहे.