नाशिक: त्र्यंबकरोडवर दुचाकी अडवून युवकाची लूट; ३२ हजाराचा ऐवज लंपास
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवरील उज्वल एजन्सी भागात दुचाकी अडवित भामट्यांनी दमदाटी करीत २५ वर्षीय युवकास लुटल्याची घटना घडली. या घटनेत भामट्यांनी दुचाकीस्वाराच्या गळयातील चांदीची साखळी, रोकड आणि मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल काळू पगार (रा.तळेगाव अंजनेरी ता.जि.नाशिक) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पगार गेल्या गुरूवारी (दि.११) उज्वल एजन्सी समोरील औद्योगीक वसाहतीतून निघणा-या रोडने तो त्र्यंबकरोडकडे आपल्या दुचाकीवर येत असतांना मारूती मंदिर परिसरात मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्याची दुचाकी अडविली.
यावेळी भामट्यांनी त्यास शिवीहगाळ व दमदाटी करीत त्याच्या गळयातील चांदीची साखळी, खिशातील रोकड आणि मोबाईल असा सुमारे ३२ हजार ५०० रूपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.