नाशिक: ट्रॅक्टर ट्रॉली उलटून कारवर धडकल्याने मायलेकी, दाम्पत्यासह ६ ठार

नाशिक: ट्रॅक्टर ट्रॉली उलटून कारवर धडकल्याने मायलेकी, दाम्पत्यासह ६ ठार

नाशिक (प्रतिनिधी): वणी-कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून कारवर धडकल्याने ट्रॉलीमधील सहा जण ठार झाले.

यात मायलेकींसह एका दाम्पत्याचा समावेश आहे. सर्व मृत जळगाव जिल्ह्यातील आहेत.

१६ जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यातील सहा गंभीर जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील हे मजूर दिंडोरी तालुक्यातील संगमनेर येथून रस्त्याच्या कामासाठी जात असताना गुरुवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान वणी-कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह समोरून येणाऱ्या कारवर उलटला.

कारमधील तिघांनी समोर काळ दिसताच गाडी कडेला थांबवून उड्या मारल्या, पण या अपघातात ट्रॅक्टर ट्राॅलीतील सहा जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मजूर कळवण तालुक्यातील काम आटोपून दिंडोरी तालुक्यातील कामावर येत असताना हा अपघात झाला. १७ जखमींपैकी तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला.

यात एका बालिकेचा समावेश आहे. तीन जण वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मरण पावले. मृतांत वैशाली बापू पवार (४), सरला बापू पवार (४५), पोपट गिरीधर पवार (४०, सर्व रा. उंदीरखेडा ता. पारोळा, जि. जळगाव), बेबाबाई रमेश गायकवाड (४०), आशाबाई रामदास मोरे (४०, रा. अंजनेरा), ५) रामदास बळीराम मोरे (४८, सर्व रा. अंजनेरा, ता. पारोळा, जि. जळगाव यांचा समावेश आहे.

वणी येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर सुरु असलेले उपचार:
अपघातात सागर रमेश गायकवाड (२३, रा. अंजनेरा), सुरेखा अशोक शिंदे (२२, रा. हिंगाेणा), संगीता पोपट पवार (४५, रा. उंदिरखेडा, लक्ष्मण अशोक शिंदे (२१, रा. हिंगोणा), सुवर्णा पोपट पवार (१३, रा. उंदिरखेडा), विशाल पोपट पवार (११, रा. उंदिरखेडा), आकाश पोपट पवार (१५, रा. उंदिरखेडा), तनू दीपक गायकवाड (३, रा. कुसुंबा), दीपक बाबूलाल गायकवाड (३०, रा. कुसुंबा), अनुष्का दीपक गायकवाड (१, रा. कुसुंबा), मनीषा दीपक गायकवाड (२४, रा. कुसुंबा), गणेश बापू पवार (७, रा. उंदिरखेडा), प्रिया संजय म्हस्के (३, रा. जामनेर), अजय नवल बोरसे (२, रा. मिराड), बापू पवार (४५, रा. उंदिरखेडा) जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच वणी व कळवण पोलिस तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींची संख्या अधिक असल्याने वणीतील खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमींवर उपचार करण्यास मदत केली.

घटनास्थळी परिस्थिती हृदय हेलावणारी होती. एक बालिका जागीच मरण पावल्याने तिच्याकडे पाहून १० वर्षांची बहीण आक्रोश करीत होती. मजुरांचे विखुरलेले सामान, ट्रॅक्टर व ट्रॉलीचे झालेले तुकडे अपघाताची भयानकता दाखवत होते. वणी पोलिसांत याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790