नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड परिसरात एका सोसायटीत गळा चिरून खून केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी तुषार सिद्धार्थ पवार (वय 29, रा. त्रिवेणी पार्क, इंद्र प्लाझा सोसायटी, जेलरोड, नाशिकरोड) व त्याचा अल्पवयीन मित्र हे दि. 28 मे रोजी तुषार पवार याचा मित्र मयत इसम नामे प्रवीण दिवेकर याच्याकडे सायंकाळी पाच वाजता जेवणासाठी व दारू पिण्यासाठी गेले होते.
दारू पीत असताना रात्री 12 वाजेच्या सुमारास प्रवीण याने आरोपी तुषार पवार यास मी तुला एका पक्षाचे पद देतो, तू मला तुझ्या वडिलांकडून 15 हजार रुपये घेऊन दे, असे सांगितले. त्याला तुषार पवार याने नकार दिला. तेव्हा प्रवीण दिवेकर याला त्याचा राग आला. दोघांमध्ये वादविवाद झाले. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन त्याने त्याच्याजवळ असलेला छोटा चाकू तुषार पवार याच्याकडे फेकला असता तुषार पवार बाजूला झाला.
याचा तुषार पवार यास राग आल्याने त्याने किचनमध्ये जाऊन दुसरा चाकू आणून प्रवीण याच्या गळ्यावर व छातीवर चाकूचे वार केले तसेच शेजारी असलेला कुकर प्रवीण याच्यावर मारून फेकला व विळीने प्रवीणच्या गळ्यावर वार केले, तसेच बिअरच्या बाटल्या प्रवीणच्या डोक्यात फोडून तीच बाटली त्याच्या पोटावर मारली. प्रवीण रक्ताच्या थारोळ्यात तेथेच कोसळला. त्यानंतर प्रवीण याने कोणाला कॉल करू नये म्हणून त्याचा मोबाईल घेऊन दोन्ही आरोपी प्रवीणच्या मोटरसायकलने त्र्यंबकेश्वरला पळून गेले. त्र्यंबकेश्वरला त्यांनी चाकू एका ठिकाणी लपविला व दुसर्या आरोपीने कपड्यांवर रक्त असल्यामुळे ते त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर ते आडगावच्या हद्दीत निघून आले. आरोपी तुषार पवार व प्रवीण यांची सन 2012 मध्ये उपनगर येथील एका संघटनेच्या माध्यमातून ओळख झाली होती.
दरम्यान, या प्रकरणी मधुकर नानाजी दिवेकर (वय 75, रा. गुरुकृपा हौसिंग सोसायटी, सानपाडा, नवी मुंबई) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा प्रवीण मधुकर दिवेकर (वय 47, रा. हेतल सोसायटी, जुना सायखेडा रोड, दसक, नाशिकरोड) याचा खून झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे पथक व गुन्हे शाखेचे पथक तपास करीत होते. आडगाव ते दहाव्या मैलाच्या दरम्यान ते दोघे आरोपी आले असता गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत.