नाशिक: घरकामासाठी असलेल्या मोलकरणीनेच केली ११ लाख रुपयांची चोरी
नाशिक (प्रतिनिधी): घरकामासाठी असलेल्या मोलकरणीने घरमालकिणीचे लक्ष विचलित करून वेळोवेळी सुमारे 11 लाख रुपयांची चोरी केल्याची घटना पंडित कॉलनीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी वैशाली अनिल जैन (रा. स्नेह बंगला, नवीन पंडित कॉलनी, नाशिक) यांच्या बंगल्यात किरण ज्ञानेश्वर साळवे (वय 31, रा. ध्रुवनगर, गंगापूर रोड, नाशिक) ही महिला घरकामासाठी मोलकरीण म्हणून काम करीत होती.
मोलकरीण साळवे हिने घरातील काम करीत असताना जैन यांचा विश्वास संपादन केला.
दि. 21 डिसेंबर 2021 ते दि. 3 फेब्रुवारी 2022 दरम्यान या बंगल्यात काम करीत असताना या मोलकरणीने जैन यांच्या घरातून वेळोवेळी पैसे चोरून नेले. ही बाब जैन यांच्या लक्षात आल्यानंतर मोलकरणीकडे विचारणा केली; मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.
- नाशिक Viral Video : दुचाकीला कारची धडक, महिलेला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं
- Breaking: डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांड, संदीप वाजेचा ‘हा’ साथीदार गजाआड
दरम्यान जैन यांच्याकडे काम करीत असताना वेळोवेळी सुमारे 10 लाख, 94 हजार रुपये चोरून नेल्याच्या संशयावरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात मोलकरणीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये करीत आहेत.