नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी गणेशवाडी परिसरात कित्येक दिवसांपासून गटारमिश्रित पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
मंगळवारी (ता. १३) दुपारी मनपा पंचवटी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी नेमके येते कुठून याची चाचपणी केली खरी पण यावर तोडगा न निघाल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दूषित पाणीपुरवठ्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
जानेवारीच्या सुरवातीला नळाला गटारमिश्रित दूषित पाणी येऊ लागल्यावर येथील नागरिकांनी रोष व्यक्त करत विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
त्यामुळे जागे झालेल्या यंत्रणेने पिण्याच्या पाण्याच्या लाइनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळते कोठे, याचा शोध घेतल्यावर नळाला काहीकाळ स्वच्छ पाणी आलेही, परंतु गेल्या महिन्यांपासून पुन्हा चक्क गटारमिश्रित पाणी न येऊ लागल्याने स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे.
पंचवटी पाणीपुरवठा खात्याचे उपअभियंता दत्तात्रेय बागूल यांनी मंगळवारी दुपारी या भागात येऊन पाहणी केली. येत्या दोन दिवसांत शुद्ध पाण्याचे आश्वासन दिले, परंतु नियमित पाणीपट्टी भरूनही नळाला गटारीचे पाणी येत नसल्याने त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
आम्ही कष्टकरी असल्याने कोणतेही पाणी दिले तरी चालते, अशी धारणा मनपा अधिकाऱ्यांची झाली काय, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.
असे गटारमिश्रित पाणी उच्चभ्रू वसाहतीत करून पाहा, असा उद्विग्न सवालही येथील महिलांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे कमी दाबामुळे हंडाभर पाण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे वाट पाहावी लागते, असे महिलांनी सांगितले.
अल्पदाबाने पाणीपुरवठा:
गणेशवाडी, सहजीवननगर, गिते गल्ली, शेरी मळा भागात काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाने तेही दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे एखाद्या नव्याने विकसित झालेल्या भागासारखाच येथील अनेक ठिकाणी चक्क टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. परिसरातील हरिहरेश्वर, हरिचरण या मध्यवस्तीतील सोसायटीत तर गेल्या कित्येक दिवसांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. .