Nashik Crime: मुले पळविणारे समजून नाशिकच्या तिघांना मारहाण

👉 नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा !

नाशिक (प्रतिनिधी): आयुर्वेदिक उपचारासाठी पेठ तालुक्यात गेलेल्या तिघांना मुले पळविणारे समजून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे…

तिघांपैकी एक नाशिक महापालिकेचा कर्मचारी असल्याचे सांगत असतानाही जमावाने न जुमानता तिघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर सदर प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही लहान मुले पळविल्याचा एकही गुन्हा दाखल नसताना केवळ सोशल मीडियावर व्हायरल अफवेमुळे मारहाणीच्या घटना घडत आहेत.

तरी नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पेठ पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

नाशिक येथील मनपाचे एका कर्मचाऱ्याच्या बहिणीला पोटाचा त्रास आहे. त्यांच्यावर पेठ तालुक्यातील बागाचा पाडा येथे नामदेव गावित (महाराज) यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन पुरुष व एक महिला असे तिघे जण बागाचा पाड्याकडे जात होते. इनामबारी येथून ते गेले, त्याच रस्त्यालगत आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेतील मुलीने तिघांना जाताना पाहिले.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”11657,11650,11652″]

त्यात महिलेने काळा ड्रेस परिधान केला असल्याने त्या मुलीला संशय आला आणि तिने पालकांना सदर बाब सांगितली. बागाचा पाड्यावरून तिघे परतत असताना त्यांना इनामबारीच्या नागरिकांनी रोखले आणि मुले पळविणारे समजून झटापटीत मारहाण केली. या वेळी नाशिकच्या व्यक्तीने त्याचे ओळखपत्र दाखविले, तरीही जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. याबाबत पेठ पोलिसांना संपर्क साधण्यात आला.

पोलिसांनी इनामबारीत धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत तिघांनी माहिती दिल्यानंतर सदर प्रकार गैरसमजातून झाल्याचे समोर आले. तसेच या वेळी बागाचा पाड्याचे नामदेव गावित यांनाही बोलावून घेतले होते. त्यांनीही सदरील व्यक्ती या त्यांच्या गुजरातच्या नवसारीत राहत असलेल्या बहिणीला गेल्या तीन वर्षांपासून घेऊन येत असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी जमावाला अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790