नाशिक: किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे शेतातील गहू काढण्यासाठी कोणाच्या शेतात अगोदर यंत्र न्यायचे या वादातून काल (दि.१५) रोजी सायंकाळच्या सुमारास ३२ वर्षीय युवकाला दोघांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.
त्यानंतर सदर युवकास सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला…
याबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश यादव आंधळे असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पावसाचे वातावरण असल्याने शेतात उभा असलेला गहू सोंगण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती.
त्यामुळे गहू काढणीसाठी आलेले यंत्र अगोदर कोणाच्या शेतात न्यायचे यावरून अंकुश आंधळे आणि दोघांत भांडण झाले. त्यानंतर दोघांनी अंकुश यास बेदम मारहाण केली.
नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
या मारहाणीत अंकुशला जबर मार लागल्याने त्याला सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. यानंतर अंकुश यांच्या कुटुंबियांनी वावी पोलीस ठाण्यात येऊन मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर वावी पोलिसांनी आरोपी मारुती बस्तीराम दराडे व रामचंद्र नाना दराडे यांच्यावर ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
- नाशिकहून गोवा, अहमदाबाद व नागपूरसाठी विमानसेवा सुरु; असे आहे वेळापत्रक
- त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत, आता चार वर्षाच्या मुलीचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू
दरम्यान, यानंतर पोलिसांनी तात्काळ संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना केले असता त्यातील संशयित आरोपी रामचंद्र दराडे यास ताब्यात घेण्यात आले. तर दुसरा संशयित आरोपी मारुती दराडे हा अजून फरार असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक विजय सोनवणे, पो. ह. नितीन जगताप, दशरथ मोरे, पंकज मोंढे करत आहेत.