नाशिक: ‘ओल्या पार्टी’चा बेत आखून मैत्रिणीच्या घरातच पाच लाखांच्या दागिन्यांवर केली हातसफाई
नाशिक (प्रतिनिधी): मैत्रिणीच्या घरी तिचा ताणतणाव हलका करण्यासाठी ओल्या पार्टीचा बेत आखून मित्रांनीच तिचे पाच लाखांचे दागिने आणि साठ हजार रुपयांची रोकड लुटून पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात संशयित दोघा मित्रांसह एका मैत्रिणीवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: 0350/2022)
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिडके कॉलनीतील वावरेनगर परिसरात फिर्यादी योगिता घनश्याम यशवंतराव यांच्या फ्लॅटमध्ये ‘नाईट आउट पार्टी’चा बेत त्यांच्या मित्र मैत्रिणीने आखला होता.
गुरुवारी रात्रीपासून तर शुक्रवारी (दि. २) पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीनंतर घरातील पाच लाखांच्या दागिन्यांसह रोख रक्कम गायब झाल्याचा संशय योगिता यांना आला. त्यांनी याबाबत त्या रात्री त्यांच्या घरी आलेल्या मित्र-मैत्रिणींकडे विचारपूस केली. मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची कबुली दिली नाही.
दरम्यान योगिता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिसांनी संशयित प्रियंका कैलास पवार (रा. गंगापूर रोड), तेजस रावसाहेब पगारे (रा. एबीबी सर्कल) आणि विशाल एकनाथ घन (रा. सावतानगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी या घरगुती कारणामुळे मुलासमवेत राणेनगर येथील मित्राकडे मुक्कामी गेल्या होत्या. यावेळी तिन्ही संशयितांनी आपापसात संगनमताने फिर्यादी यांना “तुझ्या घरी पार्टी करू” असे सांगितले. त्यामुळे त्या १ डिसेंबर रोजी राहत्या फ्लॅटमध्ये आल्या. रात्री साडेनऊ वाजेपासून तिडके कॉलनीतल्या घरात मित्रांसमवेत पार्टी शुक्रवारी पहाटेपर्यंत रंगली.
मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्यादी ह्या त्यांचा मित्र तेजससोबत सीबीएस परिसरात काही कामासाठी गेल्या होत्या. तेव्हा संशयित प्रियांका आणि विशाल हे दोघेच होते. तेजस आणि फिर्यादी रात्री एक वाजेच्या सुमारास घरी परतले. आणि पुन्हा मध्यरात्री अडीच वाजता सीबीएसकडे गेले होते.
- नाशिक: बर्निंग कारचा थरार, चालत्या ओमनी कारने घेतला पेट; कुटुंबीय थोडक्यात बचावले
- नाशिक: पित्यासोबत जाणाऱ्या चिमुकल्याला ट्रकने चिरडले.. एकुलता एक मुलगा गमावला…
- नाशिक: पुतण्यानेच सुपारी देऊन केली काकाची हत्या.. कर्डेल यांच्या खुनाची उकल !
२ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता फिर्यादी यांना जाग आल्यावर घरी फक्त तेजस दिसला. ३ डिसेंबर रोजी गळ्यात सोन्याची चेन घालण्यासाठी फिर्यादीने कपाट उघडले असता, सर्वच दागिने लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी योग्य माहिती न दिल्याने फिर्यादी यांनी पोलिसांत धाव घेतली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी हे करत आहेत.
वीस तोळे सोन्याचे दागिने:
फिर्यादीत छोटे- मोठे चोवीस प्रकारचे व वीस तोळे वजनाचे दागिने चोरीस गेल्याचे म्हटले आहे. यामध्ये दोन लाख ७१ हजाराच्या सोनसाखळ्या, एक लाख १३ हजार ८२५ रुपये किमतीच्या ८ अंगठ्या, ३६ हजार रुपयांचे मूल्याची कर्णफुले, ७५ हजार रुपयांचे ब्रेसलेटसह अन्य दागिने आणि साठ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण पाच लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे नमूद केले आहे.