नाशिक: एकीकडं खाकीचं स्वप्न, दुसरीकडं चार महिन्यांची चिमुकली, दूर राहिली पण यश मिळवलंच!
आपल्या प्रयत्नात सातत्य, चिकाटी, जिद्द असेल तर कुठलीही असाध्य गोष्ट साध्य करता येते. मेहनतीच्या जोरावर माणूस कोणतेही संकट पार करू शकतो याची अनेक उदाहरणे आहेत. अशातच महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरतीच्या निकालात असंख्य तरुण तरुणींनी संकटावर मात करत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विवाहितेने आपल्या चार महिन्यांच्या मुलीला सासूच्या पदरात देऊन पोलीस भरतीत यश संपादन केले आहे.
नुकताच राज्यातील पोलीस भरतीचा निकाल लागला असून नाशिक जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाची मोहोर उमटवली आहे. ‘लहरो से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती! हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेल्या या ओळींना सार्थ ठरवत निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील दीपाली पगार- गाडे यांनी मुंबई पोलीस दलात पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण केलं.
चार महिन्यांच्या तान्ह्या मुलीला सासूच्या पदरी देऊन भरती होण्यासाठी जाणाऱ्या दीपाली पगार- गाडे या हिरकणीचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील बाबासाहेब पगार यांची कन्या असलेल्या दीपाली यांचा विवाह गोंदेगाव येथील रावसाहेब गाडे यांचा मुलगा अमोल यांच्याशी 2020 मध्ये विवाह झाला. विवाहापूर्वी विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत असतांनाच दीपालीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणास सुरुवात केली होती. विवाह झाल्यास वर्दीच्या स्वप्नांचा चुराडा होणार नसेल तरच लग्न करेन, या अटीवर दीपालीने विवाह केला. पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा दीपालीने अमोल यांना बोलून दाखविली. सुशिक्षित कुटुंब असलेल्या गाडे परिवाराने दीपालीच्या स्वप्नांच्या आड न येण्याचे ठरवले. त्यात दोघांच्या संसारात अन्वी या गोंडस मुलीचा जन्म झाला.
एकीकडे बाळाचा लळा आणि दुसरीकडे खुणावणारी पोलीस वर्दी यांच्या द्वंद्वात असलेल्या दीपालीच्या पंखात अमोलने बळ भरले. खरा प्रश्न होता त्या चिमुकलीचा. अवघ्या चार महिन्यांच्या मुलीला सोडून दूर जायचे, दीपालीचे मन होईना. तो प्रश्न सासू लता गाडे यांनी सोडविला. मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी सासू लता यांनी स्वीकारली अन दीपालीच्या स्वप्नंचा रस्ता मोकळा झाला. भरती पूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी दीपालीने थेट पुणे गाठले. अंतःकरणात पाझर फोडणारी हिरकणी आणि दुसरीकडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारी तरुणी अशा दोन्ही आघाड्यांवर दीपाली झुंजत होती. शेतीवर अवलंबून असलेल्या गाडे कुटुंबाने तडजोड करत तर कधी मोलमजुरी करत दीपालीचा खर्च भागविला. या कष्टांची जाणीव ठेवून दीपालीने देखील मैदानी कसरत आणि लेखी परीक्षेचा जोरदार सराव केला.
आनंदाश्रू थांबता थांबेना… :
दीपालीने मुंबई दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जीवतोड मेहनत घेतली. जिद्द, चिकाटी, सरावात सातत्य असेल तर यश देखील चरणी लोटांगण घेते, याची प्रचिती दीपालीला आली. नुकत्याच लागलेल्या निकालात मुंबई पोलीस दलात निवड झाल्याचे कळताच मात्र तिचे आनंदाश्रू थांबता थांबेना. वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तानुल्यापासून दूर गेलेल्या तिच्या अंतःकरणातील मातेस रडू आवरत नसल्याचे चित्र बघायला मिळाले. दीपाली पगार – गाडे हिने मिळविलेल्या यशामुळे नाशिक जिल्ह्यात दीपालीचे कौतुक होत आहे.