नाशिक: उड्डाण पुलावरून मोटारसायकल कोसळली; युवकाचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागात मध्य रेल्वेने भगूर रेल्वे गेट बंद करून उभारलेल्या उड्डाण पुलावर विजेची सोय नसल्याने रात्रीच्या अंधारात संसरी येथील वैभव रंगनाथ गाडेकर (26) या युवकाची मोटरसायकल पुलावरून कोसळली..
या अपघातात युवकाचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पथदीपांची आवश्यकता आहे.
देवळाली कॅम्प हद्दीत भगूरलगत नूतन विद्या मंदिरापासून पुढे पेट्रोल पंपापर्यंत उड्डाण पूल उभारला आहे. मात्र या उड्डाण पुलावर अद्यापही विजेची सोय केलेली नसल्याने रात्रीच्या अंधारात छोटे-मोठे अपघात घडत होते.
रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वैभव रंगनाथ गाडेकर हा युवक आपल्या मोटरसायकलने पांढुर्लीकडून देवळाली कॅम्पकडे येत असताना या पुलावर अंधार असल्याने मोटरसायकल थेट पुलावरून खाली कोसळली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
संसरी गाव येथील रहिवासी असलेला वैभव याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
![]()
