नाशिक: आई आपण पण पप्पांसोबत राहू.. पतीच्या निधनानंतर मायलेकीने संपवलं आयुष्य
जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यानंतर एका आईने आपल्या ७ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे.
पतीचा कोरोनाने मृत्यू झाला, या दुःखातून सावरत असतानाच पत्नी सुजाता हिला त्यांची 7 वर्षाची चिमुरडी ही रोज आई ‘पप्पा कधी येतील” असा प्रश्न विचारत होती. अखेर नैराश्य आल्याने विनयनगर येथे राहणाऱ्या सुजाता तेजाळे या मातेने तिच्या सात वर्षाच्या चिमुरडीसह गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
आत्महत्येपुर्वी सुजाता तेजाळे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यात म्हंटले आहे, “मी सुजाता प्रवीण तेजाळे, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने आयुष्य संपवत आहे. कारण की, माझे पती प्रवीण पंडित तेजाळे हे अचानक कोरोनाने गेले. तेव्हापासून माझे आयुष्य संपल्यासारखे आहे. आयुष्य खूप मोठं असतं पण एकट्याने राहण्यात अर्थच नाही. ना कुणाशी बोलण्याची इच्छा ना कुणाला भेटण्याची इच्छा होते. परंतु इतके दिवस फक्त मुलीसाठी कसेतरी आयुष्य काढत होते. सध्या ती खूप लहान आहे, पुढे तिचे देखील आयुष्य आहे. परंतु तिलाही पप्पांची सतत आठवण येते. पप्पा देवाघरी गेले आहे हे, मी तिला काही दिवसांपूर्वी समजावून सांगितलं, काही दिवस ती शांत राहिली. आता मात्र पुन्हा ती सतत पप्पा कधी येणार हा एकच प्रश्न मला विचारत राहते, मी पूजा केली तरीही पप्पा काय येत नाही.
या तिच्या प्रश्नाला मी काय उत्तर देऊ , आज सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक ती मला म्हणाली, ‘मम्मी, पप्पा नाही तर तू पण दुःखी राहते मी पण sad राहते, आपण पप्पांकडे जाऊयात’ तिच्या या प्रश्नावर मी आज खूप विचार केला. जर पुढे मलाच काही झालं तर तिचं काय होईल? तिला सोडून जाणं शक्य नाही. आमच्या दोघींच्या आयुष्यात आता सुख नाही. आयुष्यात जगण्यासाठी पैसा सर्व काही नसतो, असं आयुष्य काढणं खूप कठीण आहे. जसा जन्म देताना त्रास झाला तसं थोडं मन घट्ट करुन हे करणार आहे. आणि हे करताना तिला सांगणार आहे की, आपण आता पप्पांकडे चाललो आहोत. अशी समजूत काढत आमचे आयुष्य मी आता संपवत आहे. ह्यात मी जन्म देती वैरीण नाही. ह्या जगात खूप वाईट आणि विचित्र लोक आहेत. म्हणून हा असाही बराच विचार करून तिला जसा जन्म दिला तसंच तिची काळजी करून तिलासोबत घेऊन चालले आहे. बापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवाय ही अर्थ नाही’
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8444,8437,8437″]
पोलीस तपासात घरात मिळालेल्या या सुसाईड नोट मन सुन्न करणारी आहे. कोरोनामध्ये अनेक कुटुंब संपली आणि आजची ही घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे.