नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: अवैध सावकारीचा बळी, 24 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, आईचा हंबरडा
नाशिक (प्रतिनिधी): अलीकडच्या काळात युवकांमध्ये ताणतणाव आणि नैराश्यासारख्या कारणांमुळे आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर अवैध सावकारीचा फास आता हल्लीच्या तरुणांमध्ये आवळला जात असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे मानसिक तणावातून अनेकजण टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच नाशिक शहरात अवैध सावकारीमुळे अनेकांचा बळी गेल्याचे समोर आले होते. अशातच नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे.
उसनवारीचे पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने 24 वर्षीय युवकाने गळफास घेत स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल संजय गायकवाड असे या युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी देवळा पोलिसांनी संशयित दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकास अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात संशयितांचा शोध सुरू आहे. मात्र या घटनेने सावकारीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे अधोरेखित झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय हरी गायकवाड यांनी संशयित प्रवीण सदाशिव आहेर व अमोल निकम यांच्याकडून 21 लाख रुपये उसने घेतले होते. त्याबदल्यात हर्षल गायकवाडने या दोघांना तीन चेक दिले होते. मात्र खात्यावर पैसे नसल्याने हे चेक बाउंस झाले. यामुळे या दोघांनी फिर्यादीचा मुलगा हर्षल संजय गायकवाड यास प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईलवर वारंवार धमकी देत पैशांचा तगादा लावला. या त्रासाला कंटाळून हर्षल याने शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
संजय गायकवाड यांना हर्षल हा एकुलता एक मुलगा होता. अत्यंत हुशार असलेल्या हर्षलच्या निधनाने देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा प्रवीण आहेर या संशयित आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे करीत आहेत.