नाशिक (प्रतिनिधी): स्वच्छ शहर सर्वेक्षणामार्फत नाशिकमध्ये महापालिकेच्यावतीने शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. त्यानुसार, महापौर सतीश कुलकर्णी यांच्या मागणीला दुजोरा देत, आयुक्त कैलास जाधव यांनी यांत्रिक झाडूच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच स्विपिंग मशीनसाठी निविदा मागवण्यात येणार आहे.
स्वच्छ शहर सर्वेक्षणाअंतर्गत शहरात अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावण्यात यावी. यासाठी गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक व आद्योगिक आस्थापनांना प्रेरित करण्यात येत आहे. त्यानुसार, ७० ते ८० ठिकाणी कचऱ्याची आहे त्याच ठिकाणी शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात आली. अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. मात्र, प्रमुख रस्ते, मैदाने तसेच महामार्ग व अत्यंत रहदारीचे चार पदरी आणि मोठे रस्ते झाडण्याचा प्रश्न उभा राहतो. म्हणून, यासाठी यांत्रिकी झाडू वापरणे शासनाचे मार्गदर्शक तत्व आहे. त्यानुसार, नाशिक महापालिकेने या दिशेने पावले उचलत, तयारी सुरु केली असून, काही कंपन्यांकडून याविषयी माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात येणार आहे.