नाशिक (प्रतिनिधी): नायलॉन मांजामुळे दरवर्षी काहींना काही गंभीर घटना घडतात परंतु यावर्षी मांजामुळे एका महिलेचा बळी गेला आहे. यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजाला गांभीर्याने घेत मांजाची निर्मिती,विक्री आणि वापर यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
नायलॉन व काचेचा मांजा विक्रीस ठेवणारे व तो वापरणारे यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. संक्रात जवळ आल्याने लोकांनी पतंग उडवण्यास सुरुवात केली असून नायलॉन मांजाचा सर्रासपणे वापर होत आहे. यामुळे प्राणी, पक्षी आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेचा मांजाने गळा कापून मृत्यू झाल्याने या घटनेची पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी गंभीर दखल घेऊन नायलॉन व काचेच्या मांजावर कडक निर्बंध घातले आहेत. नायलॉन मांजावर आजपासून ते २८ जानेवारी पर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. या कालावधीत जर मांजाचा वापर व विक्री करताना कोणी आढळले तर त्या व्यक्तीवर कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल.