नाशिक (प्रतिनिधी): कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचे काम समाधानकारक आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात ज्यावेळी नागरिकांचे लसीकरण होईल त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होण्यासाठी अधिसंख्य केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती, राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
पोलीस मुख्यालयाच्या भिष्मराज सभागृहात आयोजित कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठकित पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डे्य, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार उपस्थित होते.
बैठकित पुढे बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, लसीकरणाच्या सुरवातीला लस घेतांना अनेकांच्या मनात भिती होती. परंतु हळूहळू भिती दूर होऊन लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी पुढे येत असून आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचे काम 74 टक्के झाले आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा देखील लवकर सुरु होणार असून नव्याने 10 केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तसेच मालेगांव मध्ये कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढावी यासाठी कोरोनाकाळात राबविलेल्या मोहिमेप्रमाणे लसीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी. नंतरच्या टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी महसूल, महानगरपालिका व जिल्हा परिषद या विभागांकडून आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड केल्यानंतर लसीकरणाच्या पुढील टप्प्यात सुद्धा प्रतिसाद चांगला मिळेल असेही त्यांनी नमूद केले.
नाशिक जिल्ह्याची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होतानाचे दिलासदायक चित्र आहे. त्यामुळे आवश्यकता नसलेले कोविड सेंटर बंद करुन आवश्यकता भासल्यास एका दिवसात यंत्रणा उभी करता येईल असे नियोजन आरोग्य विभागाने ठेवण्याबाबतची सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
मालेगावात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष मोहिम: जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक जिल्ह्यात महिन्याभरात कोरोना रुग्णांची सख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील दिलासादायक असून मृत्युदर अगदी नगण्य आहे, तसेच 16 जानेवारी 2021 पासून सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेत जिल्ह्याची टक्केवारी चांगली आहे. मालेगांव मध्ये लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. तसेच शासनाच्या सूचनेनुसार उद्यापासून इयत्ता 5 ते 8 वी वर्गाच्या शाळा सुरु होत असून त्याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचेही मांढरे यांनी सांगितले.