नवजात शिशूंना आजपासून न्यूमोकोकल लसीचा डोस
नाशिक (प्रतिनिधी): लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल न्यूमोनियाचा धोका लक्षात घेत तसेच त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी १३ जुलैपासून पालिकेच्या माध्यमातून दीड महिन्याच्या नवजात शिशूला न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे.
देशात एक हजार मुलांमागे ३४ मुले न्यूमोनियामुळे मृत्यू पावतात. राज्यात हे प्रमाण एक हजार मुलांमागे १९ आहे. या पार्श्वभूमीवर न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. बॅक्टेरियल न्यूमोनियामुळे बालकांचे मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणणे हा यामागे उद्देश असून हिप न्यूमोनिया आणि बॅक्टेरियल न्यूमोनियामुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणण्याचाही प्रयत्न आहे.
दीड महिन्यांच्या नवजात शिशूला सोमवारी पहिला डोस दिला जाईल. त्यानंतर साडेतीन महिन्यानंतर दुसरा आणि ९ महिन्यानंतर तिसरा बूस्टर डोस दिला जाईल. सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियमित लसीकरण सत्रात ही लस दिली जाणार आहे.