धक्कादायक: बनावट दस्तावेज तयार करून बिल्डरचीच फसवणूक; नाशिकची घटना
नाशिक (प्रतिनिधी): बनावट दस्तावेजाद्वारे विक्रीपत्र करून देत कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी संशयित दीपक मानकलाल कटारिया (रा. गंगापूररोड) यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती गौतम हिरण (रा. अशोका बिझनेस एन्व्केव्ह, वडाळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २०११ ते २०२१ या कालावधीत अशोका प्रेसिडेन्सी, डीकेनगर येथील सी व डी मधील फ्लॅट व दुकाने आहेत.
संशयित दीपक कटारिया यांनी २००३ पासून वेळोवेळी अशोका बिल्डवेल आणि डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीच्या मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने कंपनीचा संचालक असल्याचे खोटे दस्तावेज बनवले अशोका प्रेसिडेन्सी येथील सी व डी इमारतीमधील फ्लॅट व दुकाने विक्री करण्यासाठी संमतीपत्र देणार असे दर्शवून खरेदीखत करून कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्राच्या आधारे दस्तावेज करून देत आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार न्यायालयात केली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी संशयितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.